लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथील खनिज विकास निधीतून बांधण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे अंदाजपत्रक वगळून बांधकाम करण्यात आले आहे. या कामात गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या जिवती तालुका संघटिका सिंधू परमेश्वर जाधव यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
सन २०१८ -१९ या वर्षीच्या खनिज विकास निधीतून पल्लेझरी येथे पाणीपुरवठा योजनेसाठी विहीर मंजूर करण्यात आली होती. यासाठी २७ लाख ९९ हजार ६६७ रुपये एवढी रक्कम मंजूर झाली होती. या गावात पूर्वी पाणीपुरवठ्यासाठी एक विहीर होती. परंतु, त्या विहिरीतील पाणी पिल्याने गावात मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी या विहिरीतील पाण्याची तपासणी केली असता, यात मोठ्या प्रमाणात फ्लोराईडचे प्रमाण मिळाले. शेवटी ही विहीर पाणी पिण्यास अयोग्य घोषित करून येथील पाणी वापरणे बंद करण्यात आले.
यानंतर खनिज विकास निधीतून नवीन विहीर बांधकामासाठी २८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार कार्यादेश देण्यात आला. मात्र, संबंधित ठेकेदार व अधिकार्यांनी संगनमत करून जुन्या फ्लोराईड असलेल्या विहिरीचा गाळ काढून आणि थोडे खोदून त्याच विहिरीचे अर्धवट राहिलेले बांधकाम केले. जुन्या विहिरीचे पाणी फ्लोराईडयुक्त असल्याने नवीन विहिरीची मागणी मंजूर होऊनही अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमताने जुन्याच विहिरीचा गाळ काढून तिला बांधकाम केल्याचा मुलामा दिला. वास्तविक खनिज विकास निधीतून नवीन जागेवर गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर बांधणे अपेक्षित होते. परंतु, जुन्याच सदोष पाणी असलेल्या विहिरीची डागडुजी करण्यात आली आणि जनतेची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या जिवती तालुका संघटिका सिंधू जाधव आणि पल्लेझरी येथील ग्रामस्थांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.