साईनाथ कुचनकार, चंद्रपूर : एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट-यूजी परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. परिणामी, लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या विद्यार्थ्यांना न्याय देत, नीटची विश्वासार्हता टिकून राहण्यासाठी संपूर्ण परीक्षेची सीबीआय चौकशी करावी, या मागणीला घेऊन चंद्रपूर कोचिंग क्लास असोसिएशनच्या वतीने १८ जून रोजी चंद्रपूर येथील गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
चंद्रपूर कोचिंग क्लास असोसिएशनने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वर्षी नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. ग्रेस गुण दिल्याने आता त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार आहे. मात्र, या संपूर्ण परीक्षेमध्ये, तसेच निकालावर आता प्रश्नचिन्ह उभे असून लाखो विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. नीट परीक्षेवरून विद्यार्थी, पालकांचा विश्वास उडाला आहे. निकाल लागल्यानंतर देशातील अनेक विद्यार्थ्यांना मानसिक आघात झाला आहे. या सर्वांना जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. चंद्रपूर येथे १८ जून रोजी गांधी चौकातून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये विद्यार्थी, पालक, तसेच कोचिंग क्लास असोसिएशनचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्था, शिक्षक, तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे माहिती चंद्रपूर कोचिंग क्लास असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.विजय बदखल, सचिव नहीन हुसेन यांनी दिली. पत्रकार परिषदेला आयएमएचे अध्यक्ष संजय घाटे, डाॅ.दिलीप कांबळे, संतोष मुगले, सचिन बोंडे, सलीम खान, मयूर वनकर, तरुण मुरगम, राम मेठे, शाहबाज पठान, रवी शंकर मिश्रा आदींची उपस्थिती होती.
नीट-यूजी परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळामुळे देशभरातील असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. यामुळे या परीक्षेवरूनच विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला आहे. परीक्षेतील विश्वासार्हता टिकून राहण्यासाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. या संपूर्ण परीक्षेची सीबीआय चौकशी करणे आवश्यक आहे. या संदर्भात १८ जून रोजी चंद्रपूर येथे मूक मोर्चा काढून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. - प्रा.विजय बदखल, अध्यक्ष, चंद्रपूर कोचिंग क्लास असोसिएशन, चंद्रपूर.