चंद्रपूर : मोठ्या बहिणीचे निधन झाले. तिच्यावर जड अंत:करणाने अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, त्याचवेळी एका गरीब महिलेला रक्ताची गरज असल्याची माहिती मिळाली. सर्व दु:ख बाजूला सारून विनोद मेश्राम या वेकोलि कर्मचाऱ्याने थेट रुग्णालय गाठले आणि रक्तदान केले. त्यांनी केलेल्या रक्तदानामुळे एका महिलेचे प्राण वाचले.
जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सावली तालुक्यातील एका महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, रक्ताची गरज असल्याचे डाॅक्टरांनी तिच्या कुटुंबियांना सांगितले. कुटुंबियांनी धडपड सुरू केली. यासंदर्भातील माहिती रक्तमित्र भटाळी ग्रुपचे स्वप्नील रागीट यांना कळली. त्यांनी ग्रुपमध्ये ए पाॅझिटिव्ह रक्तगट असलेल्यांची नावे काढली. यामध्ये विनोद मेश्राम यांचा रक्तगट ए पाॅझिटिव्ह असल्याचे त्यांना दिसले.
त्यानंतर मेश्राम यांना फोन करून रुग्णालयात जाऊन रक्तदान करण्याची विनंती करण्यात आली. मेश्राम यांनी वेळ वाया न घालवता थेट रुग्णालयात पोहोचून रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर विनोद मेश्राम यांच्या सख्ख्या बहिणीची निधन त्याचदिवशी झाले असून, अंत्यसंस्कार आटोपून त्यांनी रुग्णालय गाठल्याचे सर्वांना कळले. मेश्राम यांनी सामाजिक बांधिलकी जपत दु:ख विसरून केलेल्या रक्तदानामुळे एका गरीब महिलेचे प्राण वाचले. याबद्दल मेश्राम यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
रक्तमित्र भटाळी ग्रुपचंद्रपूर येथील वेकोलि कर्मचारी स्वप्नील रागीट हे रक्तमित्र भटाळी ग्रुप चालवितात. या ग्रुपच्या माध्यमातून ते गरजूंना रक्त पोहोचविण्याचे काम करत आहेत. आजपर्यंत अनेक रुग्णांना त्यांनी ग्रुपच्या माध्यमातून रक्तदानासाठी मदत केली आहे.
रुग्णाला रक्ताची गरजसावली तालुक्यातील माया गद्देवार यांना ए पाॅझिटिव्ह रक्ताची गरज होती. यासाठी त्यांची शस्त्रक्रिया अडली होती. ही गरज लक्षात घेत स्वप्नील रागीट यांनी या महिला रुग्णाला वेकोलि कर्मचाऱ्याच्या माध्यमातून रक्त मिळवून दिले.
माझ्या मोठ्या बहिणीचे निधन झाले. याच दु:खात आम्ही होतो. मात्र, सावली तालुक्यातील एका महिला रुग्णाला रक्ताची अत्यंत गरज असल्याचा फोन आला. त्यामुळे दु:ख बाजूला सारून गरजू महिलेचे प्राण वाचविण्यासाठी अंत्यसंस्कार झाल्यानंतर थेट रुग्णालयात पोहोचलो आणि रक्तदान केले. आपल्या रक्तदानामुळे एका रुग्ण महिलेला मदत झाली, याचे मोठे समाधान आहे.विनोद मेश्रामवेकोलि कर्मचारी, चंद्रपूर