विरूर स्टेशन (चंद्रपूर) : शेजाऱ्याचा कुत्रा अंगणात आला, या क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबात वाद झाला. हा वाद विकोपाला जाताच एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर लोखंडी फावड्याच्या दांड्याने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पंचाळा येथे घडली.
गणेश मडावी (३५, रा. पंचाळा) असे मृताचे नाव आहे. गणेश मडावी हा ड्रायव्हरचे काम करून गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान आपल्या घरी आला. आल्यावर त्यांनी स्वतःच्या घरातील पाळीव कुत्रे सोडले व आंघोळ करण्यासाठी गेला. ते पाळीव कुत्रे समोर असलेल्या भोंगळे यांच्या अंगणात गेले. भोंगळे यांनी कुत्र्याला हटवले. या क्षुल्लक कारणावरून या दोन्ही कुटुंबात बाचाबाची झाली. जातीवाचक शिवीगाळ झाली.
बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. यात प्रभाकर भोंगळे यांनी गणेश मारोती मडावी यांचे दोन्ही हात पकडले व रोहित प्रभाकर भोंगळे याने फावड्याचा दांडा मडावी यांच्या डोक्यावर मारला. डोक्यावर जबर मार लागून रक्तबंबाळ झाल्याने गणेश मडावी यांना तेथील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी, सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी प्रभाकर अर्जुन भोंगळे (५०), रोहित प्रभाकर भोंगळे (२१) आणि एक महिला (४५, सर्व रा. पंचाळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, पोलीस हवालदार दिवाकर पवार, माणिक वाग्धरकर, विजय मुंडे करीत आहेत.