चंद्रपूर : गडचांदूर जवळील नांदा फाटा ललगत असलेल्या रामनगर येथे ट्रकने सायकलस्वार कंत्राटी कामगाराला उडविले. यात गंभीर जखमी कामगाराला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी वाहतूक अडवली असून मागील २ तासांपासून गडचांदूर - वानोजा राज्यमार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.
मारोती गुलबाजी नवघडे ५५ वय वर्ष राहणार बिबी असे अपघातातील जखमीचे नाव आहे. ते अल्ट्राटेक कंपनी येथे आज रविवारी सकाळी कामास गेले होते. मात्र, आज त्यांची ड्युटी न लागल्याने ते सायकलने घरी परत होते. दरम्यान, बिबीलगत असलेल्या रामनगर येथे भरधाव मालवाहू ट्कने (एमएच ३४ एव्ही २७६६ सीसीआर) धडक देत त्यांच्या उजव्या पायावरून गेली. या घटनेत मारोती गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना त्यांचा उजवा पाय कायमचा गमवावा लागला आहे. त्यांच्यावर चंद्रपूर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेल्या उपविभगिय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय आहे. मात्र, पोलीस पथक तब्बल १ तासाने घटना स्थळी दाखल झाले. जखमी मारोतींना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, संतप्त नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत वाहतूक अडवून ठेवली आहे. गेल्या २ तासांपासून गडचांदूर - वानोजा राज्यमार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. दिवसरात्र भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून यावर उपाय शोधण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.