राजुरा (चंद्रपूर) : चव्वा-अष्टा खेळू दिला नाही म्हणून संतप्त झालेल्या एकाने आपल्या मित्रालाच लोखंडी सुरीने भोकसले. यात मित्र गंभीर जखमी झाला. त्याला आधी राजुरा येथील रुग्णालयात व नंतर चंद्रपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना तालुक्यातील बामनवाडा येथे रविवारी सकाळी ९ वाजता घडली.
तालुक्यातील बामनवाडा येथे सकाळी ९ वाजता ग्रामपंचायतीच्या मागे चव्वा- अष्टा हा खेळू देत नसल्याच्या कारणाने स्थानिक शक्ती सुरेश टेकाम, वय ३१ या युवकाने गावातील महादेव शंकर कोडापे, वय २२ या आपल्या मित्राचीच लोखंडी सुरी पोटात खुपसून हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
महादेव कोडापे (२२) रा. बामनवाडा असे मृतकाचे नाव आहे. तो बामनवाडा येथे मागील अनेक वर्षांपासून वास्तव्याने राहत असून तो मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. महादेव आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. तो रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत ग्रामपंचायतीच्या मागे चव्वा - अष्टा खेळ खेळत होता. या ठिकाणी आरोपी शक्ती टेकाम तिथे आला व त्याने खेळ खेळू देण्याचा आग्रह केला. यावेळी त्याला महादेव याने नकार दिला. तेव्हा शाब्दिक वाद वाढत गेला. यानंतर शक्ती याने आपल्या घरून पाणी आणून खेळावर टाकले आणि त्यानंतर हाच राग मनात ठेवून पुन्हा घरी जाऊन लोखंडी सुरी आणली व फोनवर बोलत असलेल्या महादेव टेकाम याच्या पोटावर वार केले. यावेळी रक्तबंबाळ झालेल्या महादेवला मित्रांनी राजुरा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर स्थिती बघता त्याला चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात भरती केले. मात्र तेथे डॉक्टरांनी महादेवला मृत घोषित केले. आरोपी शक्ती घटनेनंतर स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला.
घटनेची माहिती राजुरा पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचले व मृतदेह उत्तरीय तपासणी करून गावात आणण्यात आला. यावेळी घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे करीत आहे.