भद्रावती : बेलगाव येथील एका १४ अल्पवयीन मुलीने प्रेमास नकार दिल्याने युवकाने तिच्या घरी जाऊन अंगावर पेट्रोल टाकल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी घडली. दरम्यान, हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच मुलीला लगेच बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली. सिद्धांत भेले (२८, रा. बेलगाव) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
आरोपी सिद्धांत भेले आणि पीडित मुलीची एकमेकांना ओळख होती. सोमवारी आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमासाठी प्रपोज केले. मुलीने त्याला ठाम शब्दांत नकार दिला. दरम्यान, काही वेळाने आरोपी सिद्धांत याने एका बाॅटलमध्ये पेट्रोल घेऊन थेट पीडित मुलीच्या घरी गेला आणि अंगावर टाकून जाळण्याच्या प्रयत्नात असताना कुटुंबीयांनी धावाधाव करून मुलीला बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. आज न्यायालयात हजर केले असता १५ जून २०२३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास ठाणेदार बिपीन इंगळे करीत आहे.