पालकांचा ठिय्या आंदोलन : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणारदुर्गापूर : येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित जनता कॉन्व्हेंट मंगळवारी अचानक बंद करण्यात आले. याचा विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम पडून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने पालकांनी याचा जाब विचारण्याकरिता जनता विद्यालय शाळेपुढे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.चांदा शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित दुर्गापूर येथे भाड्याच्या इमारतीत जनता कॉन्व्हेंट चालविल्या जात आहे. यात नर्सरी ते ४ थी पर्यंतचे वर्ग चालविल्या जातात. येथे १२० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. शाळा व्यवस्थापनाने चालू शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटमध्ये दाखल करवून घेतले. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्याकरिता पाठ्यपुस्तकांसह गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य खरेदी केले. या सत्राकरिता नियमीत शाळा सुरूही करण्यात आली. मात्र एक महिना होत नाही तर मंगळवारी अचानक शाळा व्यवस्थापनाने कॉन्व्हेंट बंद करण्यात येत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना घरी पाठविले. कॉन्व्हेंट का बंद करण्यात येत आहे, याची विचारणा करण्याकरिता पालक जनता शाळेत गेले असता, मुख्याध्यापक इतर शिक्षक येथे उपस्थित नव्हते. इमारत जीर्ण झाल्यामुळे दुसरी व्यवस्था होईपर्यंत कॉन्व्हेंट बंद करण्यात आले आहे. यामुळे पालकांद्वारे शांतता व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता असल्याची सूचना दुर्गापूर पोलीस ठाण्यात देण्यासाठी शिक्षक तिकडे गेले होते. जनता कॉन्व्हेंटची भाड्याची इमारत पूर्वीपासूनच जीर्ण अवस्थेतच होती. हे सर्व ज्ञात होते. मग सत्र सुरू होण्यापूर्वीच दुसरी व्यवस्था न करता कॉन्व्हेंट सुरू का केले व एक महिन्यातच ते अचानक बंद करण्यात आले, असा जाब विचारत पालकांनी ठिय्या आंदोलन केले. मुलाच्या शिक्षणासाठी केलेला शैक्षणिक खर्च व विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्ष वाया जाण्याचीही भीतीने हे आंदोलन असल्याचे पालकांनी सांगितले. (वार्ताहर)
व्यवस्थापनाकडून दुर्गापूर येथील जनता कॉन्व्हेंट बंद
By admin | Published: July 21, 2016 12:42 AM