चिमूर : चिमूर तालुक्यातील मानेमोहाळी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा तुलसी उर्फ कार्तिक भगवान जीवतोडे याला २० ऑगस्टला मानेमोहाडी फाट्यावर बेदम मारहाण करण्यात आली. ज्यामुळे त्याचा चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र मारेकऱ्याने अपघात झाल्याचा बनाव केला. हा अपघात नसून हत्याच असल्याचा आरोप करीत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेने चिमूर पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
२० ऑगस्टला मामाच्या गावाला जाण्याकरिता तुलसी उर्फ कार्तिक मानेमोहाळी फाट्यावरील बसस्टापवर थांबला होता. तेव्हा आरोपीने अचानक येऊन त्याला मारहाण करायला सुरुवात केली. ज्यामुळे स्वतःला वाचविण्याकरिता कार्तिक धावत सुटला. वाटेत भेटलेल्या ट्रॅक्टर चालकाला मला वाचवा, अशी विनंती केली. त्यामुळे चालकाने कार्तिकला ट्रॅक्टरवर घेतले. त्यानंतर आरोपीने तिथे येऊन ट्रॅक्टर चालकास धमकावून कार्तिकला ट्रॅक्टरवरून उतरुन मारहाण केली. ट्रॅक्टर चालक जिवाच्या भीतीने तिथून निघून गेला.
त्यादरम्यान गावातील दोघे गावाकडे येत असताना आरोपी एकाला मारहाण करताना दिसला. त्यामुळे ते तिकडे निघाले असता आरोपी पळून गेला. या दोघांनी जखमी कार्तिकला प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ येथे दाखल केले. मात्र आरोपीनेच कार्तिकच्या घरी जाऊन आईला कार्तिकचा अपघात झाल्याचे सांगून आरोग्य केंद्रात आणले. मात्र तिथे ट्रक्टर चालकाने आरोपीने कार्तिकला बेदम मारल्याचे सांगितले. पुढे उपचारादरम्यान कार्तिकचा मृत्यू झाला. कार्तिकची हत्याच असून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष रंजित सावसाकडे, विशाल नन्नावरे, निका श्रीरामे, प्रा. अतुल वाघमारे, शंकर नन्नावरे, प्रवीण जीवतोडे, संदीप धारणे, निखिल जीवतोडे व मुलाचे आई, वडील यांनी केली आहे.
250821\img-20210825-wa0142.jpg
चिमुर पोलीस ठाण्यात निवेदन देतांना मन आदिवासी विध्यार्थी संघटनेचे पदाधिकारी