कोरोना प्रतिबंधक नियमामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठे कार्यक्रम, प्रबोधनपर देखावे व ढोल ताशांच्या गजराला फाटा दिला. चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढून विसर्जन न करता सार्वजनिक गणेश मंडळांनी मिळेल त्या आणि सोईच्या मार्गाने बाप्पाला विसर्जनस्थळी नेताना दिसून आले. परिणामी, वाहतूक कोंडीचा प्रश्नच निर्माण झाला नाही. शहरातील प्रमुख चौकांमध्ये मात्र पोलीस बंदोबस्त होता. सार्वजनिक मंडळांना ४ फूट व घरगुती गणेशमूर्तींसाठी २ फुटांची मर्यादा ठेवल्याने यंदा चंद्रपुरात सुमारे ५०० तर जिल्ह्यात दीड हजार मंडळांनी बाप्पाची प्रतिष्ठापनाच केली नव्हती. मनपाने पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनासाठी शहरात १५ चौकांमध्ये कुंड तयार केले. हजारो भाविकांनी याच कुंडावर पूजाविधी करून बाप्पाला निरोप दिला. इरदी नदीकडे जाणाऱ्या दाताळा मार्गावरही विसर्जनकुंड तयार केल्याने भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. विसर्जनासाठी जिल्हाभरात दोन हजार पोलीस तैनात होते. मनपाने यंदा प्रथमच ‘विसर्जन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरत्या विसर्जन कुंडांची व्यवस्था केली. भाविकांनी फिरत्या विसर्जन कुंडांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बॉक्स
यंदाच्या विसर्जनाची वैशिष्ट्ये
कोरोनामुळे यंदाही साधेपणात विसर्जन
पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य
पीओपी मूर्तीला यंदा आळा
सार्वजनिक मंडळांत निरुत्साह
देखावे, ढोल-ताशे, मिरवणुकीला बंदी
फिरत्या विसर्जन कुंडांना उत्स्फूर्त प्रतिसाद