बल्लारपूर तालुक्यात पहिला प्रयोग : पारंपरिक पिकांना फाटा
मंगल जीवने
बल्लारपूर : निसर्गाचा लहरीपणा व तालुक्यात सिंचनाचा अभाव आणि बदलत्या परिस्थितीमुळे मजुरीचे नियोजन या बाबींना अनुसरून शेतीचे व्यवस्थापन ही एक गुंतागुंतीची बाब बनली आहे. पीक हाती येईपर्यंत शेतकऱ्यांचा जीव टांगणीला असतो. यंदा मात्र बल्लारपूर तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना संजीवनी देण्याचे काम केले आहे. नव्या तंत्राने फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याची लागवड करून कृषी विभागाने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविला आहे. तालुक्यातील हा पहिला प्रयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणारा आहे.
बल्लारपूर तालुक्यातील २८ किलोमीटरवर असलेले मोहाडी तुकूम हे ३९२ लोकवस्तीचे गाव. या आदिवासीबहुल गावातील शेतकरी सचिन कपूर हा सुमारे २० वर्षांपासून आपल्या शेतात धानाचे पारंपरिक पद्धतीने पीक घेत होता. त्यामधून त्याला जेमतेम उत्पादन मिळत होते. फायदा होत नव्हता. त्याला शेतीत बदल करून काही नवीन करायचे होते. अशात सचिन कृषी विभागाच्या संपर्कात आला. त्यांनी आपली व्यथा कृषी सहायक निलेश इंगळे यांना सांगितली व त्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची माहिती देऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सचिनने सदर योजनेसाठी प्रस्ताव दिला व आंबा पीक लागवड करण्याची मंजुरी मिळताच त्यांनी स्वतःच्या खर्चाने मनसर जिल्हा नागपूर येथून दशहरी व केशर या वाणाच्या कलमांची खरेदी केली व उन्हाळ्यात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ०.५० हेक्टरवर २०० आंब्याच्या झाडाची लागवड केली. उन्हाळ्यात झाडांच्या संरक्षणासाठी झाडाच्या सभोवती हिरव्या नेटचा उपयोग केल्यामुळे सघन पद्धतीने लावलेली झाडे सुरक्षित असून वाढीला लागले आहेत. या फळबागेची उपविभागीय कृषी अधिकारी यांनी पाहणी करून योग्य मार्गदर्शन केले व सचिनचा उत्साह वाढविला. यावेळी कृषी सहायक श्रीकांत ठवरे यांनी सांगितले की आंबा उत्पादनाला दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे.
बॉक्स
नव्या तंत्राचे वैशिष्ट्य
-सघन पद्धतीने १२ बाय ४ फुटच्या खड्ड्यात अंतरावर लागवड केल्या जाते. -
-झाडाची उंची १० फुटापर्यंत वाढते.
-कमी उंची असल्याने वादळ वाऱ्याने झाडाचे नुकसान होत नाही.
-एका झाडापासून सरासरी १० ते १५ किलो उत्पादन होते.
कोट
बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्य सरकारने सुरु करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. यासाठी सचिन कपूरने घेतलेला पुढाकार इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे.
-श्रीधर चव्हाण,तालुका कृषी अधिकारी,बल्लारपूर.
150721\ambaa.jpg
आंब्याच्या लागवडीची माहिती देताना अधिकारी