मूल तालुक्यातील फिस्कुटी येथील तिलोत्तमा बुध्देश्वर मानकर या महाराष्ट्र ग्रामीण जिवन्नोती अभियान अंतर्गत समूह संसाधन व्यक्ती यापदावर जून २०१७ पासून नियमित काम करीत होत्या. त्यांनी उमेदमार्फत अनेक महिलांना आत्मनिर्भर केल्या आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी ग्रामसंघाच्या माध्यमातून फिस्कुटी येथे संवर्ग विकास अधिकारी येणार असल्याचे सांगून महिलांची सभा घेण्यात आली. सदर सभेत तिलोत्तमा मानकर यांचा राजीनाम्याबाबत ठराव घेण्यात आला. दरम्यान, कामात अनियमितता, बेजबाबदार असल्याचे कारण पुढे करून उमेद अभियानातील अधिकाऱ्यांनी तिलोत्तमा मानकर यांना ८ जून रोजी समूह संसाधन व्यक्ती यापदावरून तूर्तास कमी करीत असल्याचे पत्र व्हाॅट्स अपव्दारे पाठविले. कामात अनियमितता, बेजबाबदार असेल तर किमान कामात सुधारणा करण्याबाबत पत्र देणे संधी देणे गरजेचे आहे, असा आरोप पंचायत समितीच्या सदस्या वर्षा लोनबले यांनी केला आहे. याबाबतची तात्काळ चौकशी करून संबंधितावर कारवाई करून तिलोत्तमा मानकर यांना पूर्ववत नियुक्तीचे आदेश देण्याची मागणी संवर्ग विकास अधिकारी यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरूनुले, मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.
सर्व अधिकार ग्रामसंघाला: माया सुमटकर
१६ बचत गटांचा एक ग्रामसंघ आहे. फिस्कुटी येथील ग्रामसंघांनी काही दिवसांपूर्वी सभा घेतली. सदर सभेत समूह संसाधन व्यक्ती पदावर काम करणाऱ्या तिलोत्तमा मानकर यांच्या कामाबाबत अनियमितता, वेळेवर काम करीत नसल्याबाबतचा ठराव घेऊन आमच्याकडे पाठविलेला आहे. याबाबत अजुनतरी निर्णय झालेला नाही. मात्र सर्व अधिकार ग्रामसंघाला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र ग्रामीण जिवन्नोती अभियानच्या मूल तालुका व्यवस्थापक माया समुटकर यांनी ‘लोकमत’ला दिली.