चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील मानोरा आणि कळमना या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात याद़ष्टीने त्वरित सदर प्राथमिक आरोग्य केंद्रे जनतेच्या सेवेत रूजू करावीत, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
सुधीर मुनगंटीवार यांनी वरील विषयाच्या अनुषंगाने झूम मिटिंगद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संवाद साधला. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य वैशाली बुध्दलवार, बल्लारपूर पंचायत समिती सभापती इंदिरा पिपरे, उपसभापती सोमेश्वर पद्मगिरीवार, बल्लारपूर तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, राजू बुध्दलवार, रमेश पिपरे, बल्लारपूर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांना वैद्यकीय उपचाराची योग्य सोय उपलब्ध होईल. यासाठी आवश्यक पदभरतीसुध्दा तातडीने करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी वैद्यकीय उपकरणे व फर्निचर खरेदीसाठी निधीची मागणी करण्यात आली असून प्रशासकीय मान्यता देत पहिल्या टप्प्यात मानोरा आणि कळमना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येतील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, एएनएम व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.