चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता शासनाने कठोर पाऊल उचलले असून, राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. काहींनी घरकाम करणाऱ्या मोलकरणींचे काम बंद केले आहे. त्यामुळे मोलकरणींवर मोठे संकट कोसळले असून, उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे अनेक मोलकरणींची कुठेच नोंद नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असून, सध्या स्थितीत कोरोना रुग्णसंख्या दररोज हजारी पार करीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत पसरली आहे. प्रत्येक वाॅर्ड, गल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने घरीच राहण्याचा सल्ला प्रशासन सातत्याने देत आहे. आता तर राज्य सरकारने संचारबंदी लागू केली असून, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईही केली जाणार आहे. त्यामुळे काही नागरिकांनी आपल्याकडे काम करणाऱ्या मोलकरणींना कामावरून काढले आहे. काहींनी काढले नसले तरी मालकांच्या घरापर्यंत जाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हातचे कामही जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, कोरोना रुग्णसंख्येमुळे काहींनी मोलकरणींनाही घरात न बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संकट अधिकच वाढले आहे. कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. मजुरांचा रोजगारही हिरावला आहे. त्यामुळे जगण्याचा प्रश्न प्रत्येक नागरिकावर येऊन ठेपला आहे. आता घरकामगारांवरही संकट ओढवले आहे.
चंद्रपूर शहराचा विचार केल्यास शहरात हजारो नागरिकांकडे मोलकरणी आहे. एका घरून दुसरीकडे त्या काम करतात. मात्र, संचारबंदीमुळे त्यांना जाण्याचा प्रश्न आहे. अशावेळी त्यांना मदत करणे अत्यावश्यक आहे.
बाॅकस्
एक काम करण्यासाठी मिळतात ६०० रुपये
शहरातील काही मोलकरणींच्या मते एका घरात एक काम करण्यासाठी केवळ ६०० रुपये मिळतात. यामध्ये भांडे, कपडे, साफसफाई असे काम केल्यास किमान २०० ते हजारच्या जवळपास मिळतात. असे चार ते पाच घरात काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, आता कोरोनामुळे आर्थिक प्रश्न उभा ठाकला आहे. काही घरामध्ये स्वयंपाक केल्यास दीड ते दोन हजार रुपये मिळतात. मात्र, आता जाण्या-येण्याचा प्रश्न असल्यामुळे हातचे काम सोडून देण्याची वेळ आली आहे.
बाॅक्स
नोंदणी नाही
चंद्रपूर शहरात मोठ्या संख्येने मोलकरणींची संख्या आहे. मात्र, प्रत्येकाचीच शासनाकडे नोंदणी झालेली नाही. काही मोजक्या आणि संस्थांकडून काम करीत असलेल्यांचीच नोंदणी आहे. त्यामुळे या मोलकरणींना शासनाकडून कोणतेही अनुदान अथवा शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शासनाने प्रत्येक मोलकरणींची नोंदणी करून त्यांना आर्थिक लाभ द्यावा, अशी मागणीही केली जात आहे.
कोट
कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून अनेक काम बंद झाले आहे. आता पुन्हा कोरोनामुळे काम करणे कठीण झाले आहे. अनेकांमध्ये कोरोनाची भीतीचे वातावरण आहे. काहीजण काम बंद करीत आहेत. एका वाॅर्डातून दुसऱ्या वाॅर्डात काम करायला जावे लागते. त्यामुळे जाण्या-येण्याचा प्रश्न आहे.
-आम्रपाली कोडापे
कोट
मागील वर्षभरापासून कोरोना संकट आले आहे. मागच्या वर्षी अनेकांनी काम बंद केले. मोठ्या कष्टाने कसे तरी काम मिळविले. मात्र, आता पुन्हा कोरोना संकट आल्यामुळे हातातील काम जाण्याची वेळ आली असून, जगण्याचा प्रश्न आहे. शासनाने नोंदणी नसलेल्या मोलकरणींनाही आर्थिक मदत करावी.
- शोभा वनकर