घनश्याम नवघडे
नागभीड : ७ जून २०२० दिवस नेहमीसारखाच. पण याच दिवशी नागभीडमध्ये पहिला कोविड रुग्ण आढळला होता आणि संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ माजली होती. अनुभवलेल्या त्या दिवशीच्या आठवणी सोमवारी अनेकांनी येथील सोशल मीडियावर शेअर केल्या.
साधारणतः सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आरटीपीसीआरचा रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त झाला. आणि माहिती मिळाली की नागभीड तालुक्यात ४ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यात १ रुग्ण नागभीड येथील आहे. शहरात पहिल्यांदाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रचंड खळबळ माजली. लागलीच सर्व प्रशासकीय यंत्रणा लगेच कामाला लागली. तहसीलदार मनोहर चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी, गट विकास अधिकारी प्रणाली खोचरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. खंडाळे, नगर परिषदेचे कर्मचारी तसेच पदाधिकारी, पोलीस अधिकारी आदींचा यात समावेश होता.
त्या दिवशी जशी ही बातमी समोर आली, तशी अनेकांची खात्री करून घेण्यासाठी एकमेकांना फोन करणे सुरू झाले. अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे चिंता दिसत होती. रुग्णाने कोठे कोठे प्रवास केला, तो कोणाकोणाच्या संपर्कात आला, असे अनेक प्रश्न लोक विचारत होते. लागलीच नगर परिषद प्रशासनाने शिवाजी चौक आणि गंगा माता चौकामागील संपूर्ण परिसर १४ दिवसांकरिता सील केला. पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला. जंतुनाशकांची ताबडतोब फवारणी करण्यात येऊन परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
आता कोविड सेंटरवर ज्या सोयी उपलब्ध आहेत, त्या सोयी मागील वर्षी नव्हत्या. त्यामुळे सदर रुग्णास चंद्रपूरला हलविण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करून त्यांचीही तपासणी करण्यात आली. आता सर्वच संदर्भ बदलले आहेत. आता रोजच रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत; पण कोणीही म्हणावी तेवढी चिंता वाहत असल्याचे दिसून येत नाही.