गोबर गॅस झाले नामशेष
चंद्रपूर : ग्रामीण भागात शेतीयुक्त जनावरांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे. शेणाचा तुटवडा जाणवू लागल्याने ग्रामीण भागातील कुुटुंबांसाठी इंधनाची व्यवस्था म्हणून गोबर गॅस उपयुक्त ठरत होते. मात्र, सुधारित तंत्रज्ञानाच्या प्रसाराने आधुनिक काळात यंत्रावरील शेती प्रचलित झाली आहे. त्यामुळे गोबर गॅस नामशेष झाले आहे.
नामफलक लावण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा शिरणा, विदर्भा, इरई, झरपट आदी नद्या वाहतात. परंतु, या नद्यांवर नद्यांच्या नावाचे फलक नसल्याने जिल्ह्यातून प्रवास करणा-या प्रवाशांना नदीच्या नावाबाबत अनभिज्ञता असते. चंद्रपूर जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. त्यामुळे या नद्यांच्या नावाचा फलक लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्वयंरोजगारासाठी निधी द्यावा
चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरती बंद असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ आहे.
अरुंद रस्त्यांमुळे अपघाताचा धोका
नांदाफाटा : गावालगत सिमेंट उद्योग असल्याने मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्या व वाहने वाढली. या परिसरात रस्ते अरुंद असल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
पांदण रस्त्यांवरून भांडणे
घुग्घुस : ग्रामीण भागातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते व गावाची शीव आता संकटात आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतकरी शेतीची कामे करीत आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटवून पांदण रस्ते मोकळे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खतांच्या किमती कमी कराव्या
चंद्रपूर : रासायनिक खतांच्या किमती वाढविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने खतांच्या किमती कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावे
सावली : तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले. सावली शहरात येताना अडचणींचा सामना करावा लागतो. अपघाताचा धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने डागडुजी करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवावे
चंद्रपूर : कचरा संकलित करणाऱ्यांना अत्यल्प वेतन दिले जाते. त्यामुळे कुटुंबांचे पालन पोषण करताना आर्थिक त्रास सहन करावा लागतो. लॉकडाऊनच्या काळामध्येही चोखपणे कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे कचरा संकलकांचे वेतन वाढवावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.