वरोरा : गुरूवारी सायंकाळी वरोरा तालुक्यातील अनेक गावांना अकाली पाऊस व वादळाने तडाखा दिला. तब्बल दोन तास कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वादळामुळे अनेकांच्या घरावरील छपरे उडून गेली. घरात पावसाचे पाणी शिरल्याने घरातील सामानासह धान्यदेखील ओले झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंब अडचणीत आली आहेत. गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वरोरा तालुक्यातील टेमुर्डा परिसरातील बोरगाव (शि), पांढरतळा, लोणार, पाचगाव आदी गावांना अकाली पाऊस व वादळाने तडाखा दिला. वादळ इतके भीषण होते की, लोक जीव मुठीत घेऊन आपापल्या घरात बसले होते. वादळाने अनेक घरांवरील टिनपत्र्याचे छत उडवून गेले. या टिना घरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर जाऊन पडल्या. वादळामुळे अनेकांच्या घरावरील कौले फुटली. त्यामुळे घरात पाणी शिरले. परिणामी घरात ठेवलेले धान्य पूर्णत: ओले झाले. यावेळी नागरिकांनी सुरक्षितस्थळी धाव घेतल्याने कुणालाही इजा झाली नाही. यंदा रबी हंगामातील धान्य हाती येण्याच्या अवस्थेत असतानाच तालुक्यात अकाली पाऊस व गारपिट झाली होती. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांची नासाडी झाली. त्याला आता भावही येत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. त्यातून सावरून पुढील हंगामापर्यंतच्या धान्याची घरात सोय करून ठेवणार्या शेतकर्यांवर गुरूवारी रात्री पुन्हा अस्मानी संकट कोसळले. वादळामुळे विजेचे खांब रस्त्यावर उन्मळून पडल्याने अनेक गावांतील वीज पुरवठा खंडित झाला. परिणामी पाणी समस्या उभी ठाकली आहे. (तालुका प्रतिनिधी)
वरोरा तालुक्यातील अनेक गावांना वादळाचा तडाखा
By admin | Published: May 10, 2014 12:43 AM