चांगला निर्णय : कलावंतांना प्रोत्साहन मिळणारचंद्रपूर : राज्यातील प्रत्येक मल्टिप्लेक्स सिनेमागृहात दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळात मराठी सिनेमा दाखविला जावा, अशी सक्ती करणारा कायदा अंमलात आणण्याची घोषणा राज्य सरकारने केली. यामुळे मराठी सिनेमा मराठी माणसांपर्यंत पोहचण्यासाठी मदतच होणार आहे, अशा प्रतिक्रीया येथील रंगकर्मीनी व्यक्त केल्या.येथील नाट्य दिग्दर्शक प्रशांत कक्कड म्हणाले, अलीकडे सांस्कृतिक क्षेत्रात मराठी कलावंतांची भर पडत आहे. नाट्य क्षेत्रातील कलावंत सिनेमाकडे वळत आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे प्रत्येक निर्मात्याच्या मराठी सिनेमाला थिएटर मिळणार आहे. कवी तथा नाट्य कलावंत प्रशांत मडपुवार म्हणाले, ही प्रत्येक मराठी रसिकांसाठी आनंदाची बाब आहे. मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही. त्यामुळे अनेक दर्जेदार मराठी सिनेमांंना रसिक मुकतो. झाडीपट्टी रंगभूमी तथा चित्रपट कलावंत रवी धकाते म्हणाले, शासनाने केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीला चांगले दिवस येणार आहेत.येथील नाट्यकर्मी विलास बोझावार म्हणाले, शासनाने घेतलेला हा निर्णय अभिनंदनियच आहे. मराठी भाषा, मराठी सिनेमा आणि मराठी माणसासाठी ही बाब अतिशय आनंदाची आहे. यामुळे मराठी सिनेमाला सुगीचे दिवस येण्यास मदतच होणार आहे. नाट्यकर्मी किशोर जामदार म्हणाले, शासनाचा हा निर्णय मराठी सिनेमाला संजीवनी देणारा ठरणार आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते, हे महत्वाचे आहे. छोट्या शहरांपर्यंत अजुनही मराठी सिनेमा पोहचत नाही. त्यामुळे दर्जेदार मराठी सिनेमा पाहण्यापासून मराठी रसिकांना मुकावे लागते. आता मेट्रो सिटीतील मल्टिप्लेक्स सिनेमागृहात दररोज मराठी सिनेमा पाहता येणार आहे. सिनेरसिक माणिक नरड म्हणाले, उशिरा का होइना, पण शासनाने घेतलेला हा निर्णय मराठी कलाकारांना आणी मराठी भाषेला न्याय देणारा ठरणार आहे. शासनाच्या या निर्णयाला आता प्रक्षकांनी सुद्धा साथ देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
मराठी सिनेमा मराठी माणसांपर्यंत पोहोचणार
By admin | Published: April 08, 2015 12:10 AM