लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने करोना विषाणूचा (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता चंद्रपूर मनपा क्षेत्रातील बाजारपेठा ३१ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. यावेळाव्यतिरिक्त इतर वेळांमध्ये बाजारपेठा बंद असतील, असेही आदेशात नमूद आहे. त्यामुळे गुरुवारपासून ३१ मार्चपर्यंत चंद्रपुरातील बाजारपेठेत सकाळी आणि रात्री शुकशुकाट असणार आहे.दरम्यान, चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी आता बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी तपासणीच्या सक्तीला व घरातच विलगीकरण प्रक्रियेला राबविण्याचे आवाहन केले आहे. बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांनी, प्रवाशांनी आपल्या घरातील अन्य सदस्यांची काळजी घेत घरातच राहावे, असे आवाहन केले असून गुरुवारपासून रेल्वेस्थानक व बसस्थानकावर महानगरपालिका प्रशासनामार्फत कोरोना सल्ला केंद्र उभारले जाणार आहे. नागरिकांनी ०७१७२-२७०६६९ या क्रमांकावर आवश्यकता भासल्यास संपर्क साधून योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.बुधवारी मनपा स्थायी सभागृहात आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर क्षेत्रातील व्यापारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी व्यापारी संघांनी सहमतीने आदेशानुसार ठराविक वेळात प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे व पूर्ण सहयोग करण्याचे मान्य केले. सध्या कोरोना विषाणूचा जो प्रादुर्भाव सुरु आहे, तो रोखण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने जे आदेश काढलेले आहे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र यांच्याकडून जे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार औषधी, दूध, भाजीपाला, किराणा सामान व इतर जीवनावश्यक वस्तू वगळता शहरातील इतर सर्व वस्तू सेवांच्या बाजारपेठ सकाळी व रात्री बंद करण्याचे आदेश मनपातर्फे देण्यात आले होते. चंद्रपूर शहरातील चित्रपटगृह, मॉल, नाटयगृह, व्यायामशाळा, पानठेले, खर्रा विक्री केंद्र, तरणतलाव, अंगणवाडया मोठी मंगल कार्यालये, लग्नाचे हॉल, लॉन्स यांना यापूर्वीच मनपाद्वारे नोटीस देऊन बंद करण्यात आले आहे. याप्रसंगी व्यापारी वर्गाच्या विविध शंका प्रश्नांचे आयुक्तांनी निरसन केले.याप्रसंगी आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विशाल वाघ, गजानन बोकडे, सहायक आयुक्त शीतल वाकडे, सचिन पाटील, शहर अभियंता महेश बारई, डॉ. कीर्ती राजूरवार तसेच मनपा आरोग्य विभागाचे संपूर्ण कर्मचारी उपस्थित होते.व्यापारी संघटनांची मान्यताया अनुषंगाने आयुक्त यांनी व्यापारी संघटना प्रतिनिधींना आपली व्यापारी प्रतिष्ठाने ३१ मार्चपर्यंत नियोजित वेळेतच सुरू करण्याचे आवाहन या बैठकीत केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन चंद्रपूर चेंबर आॅफ कॉमर्सशी संलग्नित ३१ विविध व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी त्यांची दुकाने बंद ठेवण्याचे मान्य केले, अशी माहिती चंद्रपूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी यांनी दिली. तसेच इतर सर्व व्यापारी वर्गाच्या बैठकी घेऊन जनजागृती करण्याचे मान्य केले.३१ मार्चपर्यंत बैलबाजार बंदवरोरा : कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा, जि. चंद्रपूर अंतर्गत समितीकडून रविवारी वरोरा येथील मुख्य बाजार व सोमवारी माढेळी येथील उपबाजार, शेगाव अंतर्गत चारगाव बु येथे मंगळवारी भरविला जाणारा बैलबाजार ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आला आहे, अशी माहिती समितीने दिली आहे.बल्लारपुरातील दुकानेही बंदबल्लारपूर : बल्लारपूर शहरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी शहरातील दुकानदारांना दिले आहे. किराणा सामान, दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू आणि मेडिकल वगळून बाकी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश सांगण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार असा इशारा, या आदेशात देण्यात आला आहे.मूलमध्ये ठिकठिकाणी हॅन्ड वॉशमूल : कोरोना व्हायरसचा प्रचार झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद मूलचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी विशेष लक्ष घालत होर्डींग्स, बॅनर, मूल शहरातील आवश्यक स्थळी हॅड वॉश आदी लावण्यात येऊन जनजागृती केली जात आहे. तसेच गुरुवारपासून पानठेले बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मूल शहरातील रेल्वे स्टेशन, आठवडी बाजार, तहसील कार्यालय, पंचायत समिती, गुजरी चौक, उपजिल्हा रुग्णालयाजवळ, नगरपरिषद कार्यालय या ठिकाणी हॅन्डवॉश सुविधा उपलब्ध केली आहे.विवाहसोहळ्याची तारीख रद्दकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कौटुंबिक कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपूर येथील १९ मार्चला होणारा विवाह सोहळा रद्द करण्यात आला आहे. सुनील पुंडलिकराव बानकर यांच्या अनुजा नावाच्या मुलीचा विवाह चंद्रपूर येथील बबनराव भोयर यांच्या मुलगा राहुल यांच्याशी १९ मार्च २०२० ला विवाह सोहळा आयोजित केला होता. मात्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळता यावा व उगाच सोहळ्यानिमित्त गर्दी होऊ नये, या उद्देशाने सदर विवाहसोहळा रद्द करून तो पुढे ढकलण्याचा निर्णय बानकर व भोयर कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वस्तरावतून कौतुक होत आहे.
बाजारपेठा सकाळी आणि रात्री बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 6:00 AM
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कौटुंबिक कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपूर येथील १९ मार्चला होणारा विवाह सोहळा रद्द करण्यात आला आहे. सुनील पुंडलिकराव बानकर यांच्या अनुजा नावाच्या मुलीचा विवाह चंद्रपूर येथील बबनराव भोयर यांच्या मुलगा राहुल यांच्याशी १९ मार्च २०२० ला विवाह सोहळा आयोजित केला होता.
ठळक मुद्देजिल्ह्यातीलही बाजारपेठांवर निर्र्बंध : सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंतच दुकाने सुरू