चंद्रपूर : आंध्र प्रदेशातून चंद्रपूरकडे जाणाऱ्या धावत्या बसमधून उडी घेतल्याने एका विवाहित युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ३०) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास गडचांदूर बसस्थानकापासून काही अंतरावर घडली. राकेश इंद्रजीत पटेल (२५, रा. रिवा मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे, या बसमध्ये पत्नी व दोन नातेवाईकही बसले होते. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
राजुरा-गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामावरील वाहनावर राकेश पटेल हा चालक म्हणून कार्यरत होता. एक वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला. तो खेर्डी येथे पत्नीसोबत भाड्याच्या घरात राहत होता. आंध्र प्रदेश महामंडळाच्या एपी २९ झेड १५४३ क्रमांकाच्या बसमधून पत्नी व दोन नातेवाईकांसोबत गडचांदूरवरून चंद्रपूरकडे जात होता. दरम्यान, गडचांदूरच्या बसस्थानकापासून काही अंतरावर त्याने धावत्या बसमधून अचानक उडी घेतली.
चालक व प्रवाशांनी त्याला लगेच जखमी अवस्थेत त्याच बसमधून ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे पथकासह रुग्णालयात पोहोचले. पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह मूळ गावी पाेहोचविण्याची व्यवस्था तसेच पैशाची मदत खिर्डीचे उपसरपंच दीपक खेकारे, अरविंद बावणे यांनी संबंधित कंत्राटदाराशी बोलून केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास गडचांदूर पोलिस करीत आहेत.