वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवानगीने विवाह सोहळे व धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. विवाह सोहळ्यास ५० व्यक्तींची परवानगी दिली जाते. अशा ठिकाणी हजारो लोक उपस्थित राहत असल्याने, प्रशासनाने त्याची तत्काळ दखल घेत, त्यावर कारवाई करण्याकरिता महसूल, पोलीस व नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. सदर पथक दररोज मंगल कार्यालय सभागृह, जिमला भेट देऊन तपासणी करीत आहे. या आधी प्रशासनाने मंगल कार्यालय व सभागृह संचालकांची बैठक घेतली. विवाह सोहळ्यास ५० व्यक्तींना परवानगी दिली जात आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त लोकांना गोळा होऊ देऊ नका, असे सांगण्यात आले, परंतु या नियमाकडे दुर्लक्ष करत हजारो लोक उपस्थित राहत आहेत. त्यामुळे वरोरा शहरातील एका मंगल कार्यालय व जिमकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
बॉक्स
अनेक विवाह सोहळे रद्द
कोरोना विषाणूचा प्रसार संपत आल्याचे नागरिक मानत होते. त्यामुळे धडाक्याने विवाह सोहळे आयोजित केले, परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली. त्यामुळे आयोजक व मंगल कार्यालय संचालक यांच्यावर दंड अथवा गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी विवाह सोहळे रद्द केल्याचे समजते.
बॉक्स
विनामास्क सात हजार रुपयांचा दंड
वरोरा शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे सुरू केले आहे. यात एकाच दिवशी सात हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.