ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील पती, पत्नी व दोन मुले या चौघांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली असली तरी ती रविवारी सकाळी पत्नी गीता रमाकांत ठाकरे (५०) हिच्या मृत्यूनंतर उघडकीस आली. पती रमाकांत दामोधर ठाकरे (५५), राहुल रमाकांत ठाकरे (२८), मनोज रमाकांत ठाकरे (२६) यांची प्रकृती अत्यवस्थ असून तिघेही शासकीय रुग्णालयात दाखल आहेत.
हाताला काम नाही, घरात कुणीही कमावता नाही. यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या परिवाराने टोकाची भूमिका घेत तणनाशक प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ब्रह्मपुरी येथील सहकार कॉलनीत घडली. यात घरातील पती, पत्नी व दोन तरुण मुलांचा समावेश आहे. दोन रात्र व एक दिवस चौघेही बंद घरामध्ये त्याच अवस्थेत होते.
रविवारी पहाटे पत्नीची प्रकृती गंभीर झाल्याने पती रमाकांत याने देलनवाडी वार्डातील भावाचे घर गाठून सदर प्रकार सांगितला. चौघांनाही ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान गीता ठाकरे यांचा काही वेळातच मृत्यू झाला. राहुल व मनोज यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील मनोजची प्रकृती गंभीर आहे, तर वडील रमाकांत यांना ख्रिस्तानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे समजते. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
चार प्रकारचे तणनाशक मिसळून केले प्राशन
शहरातील एखाद्या कृषी केंद्रातून चार प्रकारचे तणनाशक आणून ते सर्व एकत्र मिसळून घेतल्याची माहिती आहे. हळूहळू विषाचा परिणाम झाल्याने व बंद घरामध्ये सर्व जण असल्याने कुणालाही ही घटना लक्षात आली नाही.