चंद्रपूर : येथील जटपुरा गेट वाॅर्डातील शंभर वर्षे जुने दोन चिंचेचे झाड एकाने पर्यावरण विभागाची परवानगी न घेताच तोडले. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. तर दुसरीकडे हेरिटेज ट्री असलेले वृक्ष तोडले गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
जटपुरा वाॅर्डमधील सेंट मायकल स्कूल समोर शंभर वर्षे जुने दोन चिंचेचे वृक्ष होते. या वृक्षांची वृक्ष गणनेदरम्यान नोंदही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण विभागाने हेरिटेज ट्रीचे संरक्षण, संवर्धन करण्यासंदर्भात नुकतेच आदेश दिले आहे. त्यामुळे या वृक्षांचे संवर्धन करणे अत्यावश्यक होते. असे असतानाच एकाने महापालिका पर्यावरण विभागाची परवानगी न घेताच एका वृक्षाचे बुडापासून तर दुसऱ्याच्या फांद्या छाटल्या आहे. या घटनेमुळे पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, महापालिका तसेच इक्रो प्रोच्या सदस्यांनी पंचनामा केला आहे. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
बाॅख्स
फलक लावा -इक्रो प्रो
शहरातील १०० वर्ष वयाची वृक्षांची नोंद वृक्षगणनेदरम्यान करण्यात आली आहे. दरम्यान, नुकतेच पर्यावरण विभागाने हेरिटेज ट्री चा दर्जा दिलेला असून त्यांचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले आहे. याबाबत स्थानिक पातळीवर हेरिटेज वृक्षाजवळ महानगरपालिकेकडून फलक लावण्याची मागणी इक्रो-प्रोचे बंडू धोतरे यांनी केली आहे.