लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या तुलनेत जिल्हा सामान्य रुग्णालयातील साहित्य कमी पडत आहे. रुग्णांना सुविधा मिळावी तसेच प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरतर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयाला विविध साहित्य भेट देण्यात आले. रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मागील वर्षभरापासून रोटरी क्लबतर्फे विविध साहित्याचे वितरण सुरु आहे. दरम्यान, सध्याची रुग्णसंख्या बघता, व्हिलचेअर, ऑक्सिमीटर, एन ९५ मास्क अशाप्रकारचे साहित्य देण्याविषयी प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. आसावरी देवतळे यांनी रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष महेश ऊचके यांना सांगितले. याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष आणि सचिव मनिष बोराडे यांनी क्लबच्या सदस्यांना आवाहन केले. त्यानुसार सदस्यांनी मदतीचा हात दिला.
आसावरी देवतळे यांनी सुचविल्यानुसार साहित्याचे वितरण करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब चंद्रपूरचे अध्यक्ष महेश उचके, सचिव मनिष बोराडे यांनी दिली.