वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : भारताचा या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या उत्तर-दक्षिण उल्लेख करताना हिमालय ते कन्याकुमारी असे आपण म्हणत असतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा या टोकापासून त्या टोकापर्यंतचा विस्तार उल्लेखताना चांदा ते बांदा असे राज्यात सर्वत्र म्हटले जात असते. आता, चांदा आणि बांदा ही दोन शहर नेमकी कुठे व त्या शहरांचा नवीन जुना इतिहास काय, हे जाणून घेउ या! चांदा अर्थात चंद्रपूर हे जिल्ह्याचे मुखालय असलेले शहर विदर्भात, राज्याच्या एका टोकाला तेलंगणा सीमेच्या जवळ आहे. गोंडवंशीय राजांनी या भागावर सुमारे ६०० वर्षे राज्य केले. बल्लारशाह (बल्लारपूर) चा शेवटचा राजा खांडक्या बल्लारशाह यांनी चंद्रपूर शहर बसविले. या शहराचे प्रारंभीचे नाव चंद्रपूर तसेच चांदागढ असे होते. पुढे चांदा आणि १९६४ ला चंद्रपूर असे नाव झाले. पण चंद्रपूर सोबतच या शहराला लाडाने व प्रेमाने चांदा असे ही बरेच ठिकाणी म्हटले जाते.जिल्ह्याचे मुख्यालय, राजकीय घडामोडीचे केंद्र, मंत्र्यांचे शहर, औद्योगिक नगरी तसेच येथील महाकाली व अंचलेश्वर महादेव मंदिर असल्याने धार्मिक स्थळ तसेच जुन्या शहराभोवतीचे मजबूत परकोट आणि त्याला चार दिशांना चार मोठे दरवाजे असे चांदाचे वैशिष्टये आहे.बांदा हे शहर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील कोकण भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हे ऐतिहासिक शहर तेरखोल या नदीकाठी वसले आहे. पंधराव्या शतकात या शहराचे मोठे नाव होते. राजकीय घडामोडीच्या या शहराचे पूर्वी नाव होते आदिलाबाद! छत्रपती शिवाजी महाराजांनी तो भाग आदिलशहाकडून हिसकावला आणि आदिशहा हे नाव बदलवून बांदा असे नाव ठेवले. त्या भागात मराठी, मालवणी व कोकणी भाषा बोलली जाते. बंदेश्वर मंदिर व भूमिका मंदिर ही तेथील श्रद्धास्थान आहेत. तेथील किल्ल्याचा काही भाग ढासळला असला तरी इतिहासाच्या बरेचशा खाणाखुणा तेथे आहेत. चांदा आणि बांदा ही दोन्ही शहर परस्परविरूद्ध दिशेला व एकमेकापासून हजारो किलोमीटर लांब आहेत. राज्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत उल्लेख करण्याकरिता या दोन शहराचा ‘चांदा ते बांदा’असा उल्लेख केला जातो. एकंदरीत, चांदा ते बांदा ला या निमित्ताने मोठे नाव आणि महत्व मिळाले, आहे हे उल्लेखनीय!या दोन शहरांची निवड का?या दोन शहरांची नावे खूप छोटी, दोन अक्षरी आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांची शेवटची अक्षरे यमकात छान जुडतात. ते उच्चारायला सोपी आणि ऐकायलाही छान वाटतात. आणि ही दोन्ही शहरे राज्याच्या टोकावर आहेत. त्यामुळे या शहरांची निवड केली असावी. कारण कोणतेही असो, या निमित्ताने या शहरांची नावे प्रसिध्द झाली आहेत. राजकारणी भाषणातून चांदा ते बांदा असे हमखास म्हणत असतात. महाराष्ट्र राज्यातील मागास जिल्ह्यातील विकासाकरिता राज्यशासनाने नुकतीच एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेलाही ‘चांदा ते बांदा’ असे नाव देण्यात आले आहे.
‘चांदा ते बांदा’ या म्हणीचा असा झाला प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:01 PM
भारताचा या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या उत्तर-दक्षिण उल्लेख करताना हिमालय ते कन्याकुमारी असे आपण म्हणत असतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा या टोकापासून त्या टोकापर्यंतचा विस्तार उल्लेखताना चांदा ते बांदा असे राज्यात सर्वत्र म्हटले जात असते.
ठळक मुद्देचांदा म्हणजे आताचे चंद्रपूर : चांदा ते बांदा नावाने शासनाची योजनाही आली