भरगच्च उपस्थिती : कायद्याविषयी मार्गदर्शनचंद्रपूर : तालुका विधी सेवा समिती पोंभुर्णाच्या वतीने पोंभुर्णा येथील पंचायत समिती सभागृहात मेडीएशन अवेअरनेस कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी र.ना. हिवसे उपस्थित होते. दिवाणी न्यायाधीश क.स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी पोंभूर्णा एन.आर. वानखेडे, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती पोंभुर्णा लाकरे, अॅड. खोब्रागडे, तालुका विधी सेवा समितीचे सदस्य बिस्वास, सरपंच कोडापे हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन आणि पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली.अॅड. खोब्रागडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगीतले की, अनादी काळापासून ही प्रक्रिया चालू आहे. महाभारतात श्रीकृष्णाने मध्यस्थी केली होती. मध्यस्थी प्रक्रियेमध्ये दिवाणी, फौजदारी, एन.आय. अॅक्ट व इतर प्रकरणे निकाली काढली जातात. आपल्या केसमध्ये जे काही बोलणे होईल, ते गुप्त ठेवण्यात येतात. आपली प्रकरणे ही मध्यस्थी मार्फतीने निकाली निघाले तर त्यामध्ये दोन्ही पक्षकारांचा फायदा होतो.न्यायाधीश एन.आर. वानखेडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगीतले की, भारतीय संविधानात सामाजिक न्याय ही संकल्पना आहे. सामाजिक न्यायाची संकल्पना म्हणजे एखादा व्यक्ती गरीब, स्त्रिया, मुल हे न्यायापासून वंचित राहू नये म्हणून शासनातर्फे मोफत विधी सेवा देण्यात येते. भारतीय संविधानात जीवन जगण्याचा अधिकार सर्व जिवांना असल्याचे नमूद आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाला न्याय मिळणे हासुद्धा अधिकार भारतीय संविधानात नमूद आहे. कार्यक्रमाचे संचालन अॅड. किरण पाल यांनी केले तर आभार भसारकर यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
पोंभुर्णा येथे मेडिएशन अवेअरनेस कार्यक्रम
By admin | Published: July 17, 2015 12:56 AM