आशिष घुमे ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : अलिकडे वैद्यक शास्त्राने चांगलीच प्रगती केली आहे. अनेक रोगांवर त्यांनी उपचार पद्धती शोधली आहे. हृदय ट्रान्सप्लांटसारख्या शस्त्रक्रियाही करण्याचे तंत्रज्ञान त्यांनी शोधले आहे. मात्र समीरला झालेल्या मस्क्युलर डिस्ट्रफी या आजारापुढे वैद्यक शास्त्राने हात टेकले असून अजून कुठलीही उपचारपद्धती शोधण्यास वैद्यकशास्त्र असमर्थ ठरत आहे.या धकाधकीच्या जीवनात नवनवीन आजार समोर येत आहेत. चिकनगुनिया असो की मग बर्ड फ्ल्यू, असे नवीनच आजार नागरिकांना जडत आहेत. या रोगावर उपचारपद्धती वैधक शास्त्राने शोधून काढली आहे. मात्र वरोरा शहरातील कॉलरी वॉर्ड येथील रहिवासी नरेश वाटकर यांच्या मुलाला गेल्या काही वर्षांपासून मस्क्युलर डिस्ट्रफी या नावाच्या मासपेशींच्या आजाराने ग्रासले आहे. त्यांनी जिल्हातील तसेच विदर्भातील संपूर्ण दवाखाने पालथे घालूनही त्यांचा मुलाचा उपचार होऊ शकला नाही.वैद्यक शास्त्रात या आजारावर उपचार पद्धती किंवा कुठलेही औषध अजूनही शोधले नाही, असे म्हणत त्यांना परत पाठविले. वर्धा येथील एका नामवंत दवाखान्यात समीरला जवळपास एक महिना भरती करून ठेवले होते. त्याच्या रोगाबद्दल तेथील डॉक्टरांनी विदेशात झालेल्या कान्फरन्समध्ये चर्चाही केली. मात्र हा रोग नेमका कसा होतो आणि त्याच्यावर उपाय काय, हे कुणीही सांगू शकले नाही, समीरचे वडील नरेश वाटकर यांनी सांगितले.तालुकयातील आमडी (वंडकेश्वर) या गावातील मूळ रहिवासी वाटकर दाम्पत्याला एक मुलगीव एक मुलगा आहे. त्यात १४ वषार्पूर्वी समीरचा जन्म झाला. जन्माच्या वेळी व वयाच्या ७ वर्षापर्यंत सामान्य असणारा समीर पहिल्या वर्गात शिक्षण घेत होता. सामान्य मुलांना जसे आजार होतात, तसेच त्यालाही व्हायचे. त्याचे आई-वडील त्याला शहरातील जनरल फिजीशियनकडे दाखवायचे. औषधोपचार केला की तो बरा व्हायचा. शाळेत पहिल्या वर्गात असताना वैद्यकीय तपासणीकरिता एक चमू शाळेत आली होती. त्यांनी समीरची आणि इतर मुलांची तपासणी केली. त्यात समीरला मस्क्युलर डिस्ट्रफी नावाचा आजार झाला असल्याचे निष्पन्न झाले.आधी फिजीओथेरपी आणि काही दिवसानंतर त्याला शहरातील संपूर्ण खासगी दवाखान्यात तसेच चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालय तसेच इतर खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. सर्व उपाय करून थकल्यावर त्यांनी वर्धा येथील एका नामवंत दवाखान्यात समीरला नेले. तिथे त्याच्या पूर्ण तपासण्या केल्या. मात्र त्याला झालेल्या रोगावर कुठलीही औषधी नसून वैद्यकशास्त्रात कुठलाच उपचार नसल्याचे सांगून त्याला घरी पाठविण्यात आले. आता समीर १४ वर्षांचा झाला असून त्याला ९० टक्के अपंगत्व आले आहे.स्वत:च्या हाताने तो जेऊही शकत नाही. प्रचंड अशक्तपणा त्याला आला आहे. त्याला बरा करणे आज वैद्यक शास्त्रापुढे मोठे आव्हान असून ते कोण पेलेल, याकडे शहरवासींचे लक्ष लागले आहे.