लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोवर रुबेला सिटी टास्क फोर्स समितीची बैठक बुधवारी चंद्रपूर शहर महानगरपालिका स्थायी समिती सभागृहात महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गोवर रुबेला निर्मूलन मोहिमेत आजवर झालेल्या कामांचा आढावा घेऊन कामांच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मागील दोन महिन्यांपासून गोवर रुबेला संदर्भात विविध कार्यशाळा, रॅली, बैठकींद्वारे सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. याकरिता, कोअर गृप बैठक, शासकीय-खासगी शाळा त्यांचे शिक्षक मुख्याध्यापकांची कार्यशाळा, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर यांची कार्यशाळा, धर्मगुरु, स्वयंसेवी संस्था व डॉक्टर्सची कार्यशाळा आदी विविध प्रकारचे उपक्रम मनपा आरोग्य विभाग आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने राबवित आहे. गोवर रुबेला मोहीम प्रभावीपणे कशी राबविता येईल यावर चर्चा करण्यासाठी सदर सिटी टास्क फोर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.याप्रसंगी मार्गदर्शन करताना महापौर म्हणाल्या गोवर रुबेला ही लस नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना द्यावयाची असल्याने यात पालकांचा सहभाग महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे बालकांच्या आधी पालकांना समजाविणे आवश्यक आहे. शाळांमध्ये शिक्षक - पालक बैठकींद्वारे आपण पालकांना योग्य मार्गदर्शन करू शकतो. आजही सुई संदर्भात अनेक गैरसमज आहेत. ही भीती मनातून काढण्यास व मोहीम यशस्वी करण्यास स्वयंसेवी संस्था, शाळांचे शिक्षक मुख्याध्यापक, धर्मगुरू, डॉक्टर्स तसेच समाजातील सर्वांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आज लसीकरणाची माहिती व महत्त्व हे सगळ्यांनाच कळले असल्याने काम काही अंशी सोपे झाले आहे. यावेळी आयुक्त संजय काकडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. अंजली आंबटकर यांनी केले. याप्रसंगी उपमहापौर अनिल फुलझेले, अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहेरे, उपायुक्त बोकडे, सहायक आयुक्त विजय देवळीकर, धनंजय सरनाईक, सचिन पाटील, शीतल वाकडे आदी उपस्थित होते.
चंद्रपूर पालिकेत टास्क फोर्स समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:15 PM