ब्रह्मपुरीत आढावा बैठक : रेल्वे स्थानकाच्या समस्यांवर चर्चाब्रह्मपुरी : स्थानिक गोसीखुर्द विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत चिमूर-गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी रेल्वे प्रश्नासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना गुरूवारी चांगलेच धारेवर धरले. रेल्वे समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. ब्रह्मपुरी येथील रेल्वे प्लॅटफार्मच्या उंचीची मागणी कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच ब्रह्मपुरी रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांचे थांबेसुद्धा देण्यात आले नाहीत. त्यामुळे या दोन्ही समस्यांचा प्रवाशांना प्रचंड त्रास करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे खा.अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली. प्लॅटफार्मची उंची वाढविण्याचे काम व सुपर गाड्यांच्या थांब्याविषयी खा.नेते यांनी विचारणा केली असता, उत्तर देताना मुख्य अभियंता (निर्माण) नागपूर ए. के. पांडे यांनी लवकरात लवकर कामाची व खर्चाची तरतूद करुन काम सुरु करण्याचे आश्वासन दिले. आढावा बैठकीत नागभीड- नागपूर ब्रॉडगेज लाईन तयार करणे आणि वडसा-गडचिरोली नवीन रेल्वे लाईन निर्माण करण्याविषयी खासदारांनी विचारणा केली असता, रेल्वेबोर्डाकडे रितसर पाठपुरावा करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी खा.नेते यांना सांगितले. बैठकीला माजी आमदार प्रा. अतुल देशकर, परेश शहादाणी, गोपीचंद गणवीर, क्रिष्णा सहारे, जगदिश तलमले, रेल्वेचे एन. एस. पात्रा, सहाय्यक अभियंता निर्माण प्रसाद , सहायक अभियंता पांडे, गुप्ता, क्रिष्णा तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष बजाज व हरिचंद्र चोले व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
खासदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांना खडसावले
By admin | Published: April 12, 2015 12:47 AM