सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : एक वर्षाच्या आत स्मारकाचे भूमिपूजनचंद्रपूर : क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांचे स्मारक उत्कृष्ट दर्जाचे तयार करण्यात येणार असून स्मारकासाठी ३८ कोटी रुपयांची तरतूद असली तरी आदिवासी समाजाच्या हितासाठी निधीची मर्यादा राहणार नाही. स्मारक तयार करण्यासाठी आदिवासी समाजातील नेत्यांची समिती गठित करुन एक वर्षाच्या आत स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी येथे केले. ते शहीद बाबुराव शेडमाके समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना शामकुळे, स्मारक समितीचे अध्यक्ष दयालाल कन्नाके, किशोर जोरगेवार व सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक वहाने यावेळी उपस्थित होते.ना.सुधीर मुनगंटीवार व ना.हंसराज अहीर यांनी क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. ना.मुनगंटीवार पुढे म्हणाले, शहिद बाबुराव शेडमाके यांच्यावर डाक तिकीट काढण्यासाठी व आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी अंत:करणापासून प्रयत्न केले. शहीद बाबुराव शेडमाके यांचे स्मारक उत्कृष्ट दर्जाचे होणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. २५ वषार्पासून स्मारकाची मागणी होती. एक वर्षाच्या आत स्मारकाचे भूमिपूजन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आदिवासी मुलांसाठी वर्षभरात वस्तीगृह उभारण्यात येईल, असे ते म्हणाले. आदिवासींच्या कल्याणासाठी व प्रगतीसाठी शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतले असून शबरी आवास योजनेत जागा नसेल तर शासन ५० हजार रुपये भरुन जागा देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. २५ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेत शिक्षण देण्याचा निर्णयही शासनाने घेतला असून यामुळे शैक्षणिक प्रगती साधली जाणार आहे. ८० टक्केपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेल्या ग्राम पंचायतीला आदिवासी अर्थसंकल्पाच्या पाच टक्के निधी थेट देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. वनालगतच्या आदिवासी गावांना ग्रीनव्हीलेज करणार असल्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांंगितले. आमदार नाना शामकुळे, किशोर जोरगेवार व विलास मेश्राम यांची भाषणे झाली. यावेळी आदिवासी नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बाबुराव शेडमाके स्मारक उत्कृष्ट दर्जाचे होणार
By admin | Published: October 24, 2015 12:38 AM