बल्लारपूर : तालुक्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया नगण्य आहे. नसबंदीबाबत पुरुषांच्या मनातील गैरसमज अद्यापही दूर झाले नसल्याची बाब कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेच्या पुरुषांच्या आकडेवारीवरून लक्षात येते. गेल्या दोन वर्षात बल्लारपूर तालुक्यात दोन वर्षात केवळ २४ पुरुषांनीच ही शस्त्रक्रिया केली आहे. यातुलनेत ४१८ महिलांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.
देशातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रणासाठी कुटुंबकल्याण कार्यक्रम सुरू करण्यात आला. मात्र तालुक्यातील गेल्या दोन वर्षांची आकडेवारी बघितल्यास या कार्यक्रमास मिळणारा प्रतिसाद चिंताजनक आहे. कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्याकडे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचा वाटा अल्पसा आहे. यामागे पुरुषी अहंकार कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. शासनाने कुटुंबकल्याण योजनांसाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत सवलती दिल्या आहेत. स्त्रियांसोबत पुरुषांसाठीही शस्त्रक्रियेची सुविधा आहे. त्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून रोख रकमेची तरतूद आहे. तरीसुद्धा पुरुष शस्त्रक्रियेसाठी समोर येत नाही.
पुरुषांच्या शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट कागदावरच
बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विसापूर या आरोग्य केंद्रात २०१९-२०२० या वर्षात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट १०४ होते. परंतु ८ पुरुष व ३६ स्त्रियांवरच शस्त्रक्रिया झाली. कोठारी आरोग्य केंद्राचे उद्दिष्ट १११ होते, परंतु ३ पुरुष व ५१ स्त्रियांवर शस्त्रक्रिया झाली. तर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात केवळ १३ पुरुषांवर व १७५ स्त्रियांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत कोठारी आरोग्य केंद्रात ७ स्त्रिया व विसापूर केंद्रात १८ स्त्रियांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात एकाही पुरुषावर शस्त्रक्रिया झाली नाही. मात्र १३१ स्त्रियांची शस्त्रक्रिया करण्यात आली, हे विशेष. तालुक्यातील बल्लारपूर, कोठारी व विसापूर या आरोग्य केंद्रावर गेल्या दोन वर्षात केवळ २४ पुरुष व ४१८ स्त्रियांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
पुरुषांमध्ये असेही गैरसमज
शस्त्रक्रिया केल्याने आपण कमजोर होतो, हा गैरसमज पुरुषांमध्ये आहे. आता पद्धत बदललेली आहे. शस्त्रक्रिया अयशस्वी होत नाही. मात्र याबाबत आवश्यक ती करण्याची गरज आहे. यासोबतच स्त्रियांच्या वेदनाही पुरुषांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
- डॉ. प्रकाश नगराळे, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर.