लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : महाराष्ट्राच्या विदर्भ क्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा नक्षलप्रभावित असल्यामुळे या क्षेत्राच्या विकासासाठी नेहमी अडथळे येतात. जिल्ह्यात तोट्यात चालणाऱ्या महामंडळाच्या बसेस आहेत. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना जलद सुविधा देण्यासाठी मेरी गो राऊंड रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी रेल्वेचे महाप्रबंधक यांना बल्लारशाह रेल्वे स्थानकावर निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन घनश्याम मुलचंदानी यांच्यासह डीआरयूसीसीचे सदस्य जयकरणसिंग बजगोती व शिष्टमंडळातील सहकाऱ्यांनी महाप्रबंधक यांना दिले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मेरी गो राऊंड ही रेल्वे सेवा बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून सुरू होऊन चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, हिंगणघाट, सेवाग्राम, नागपूर भंडारा, गोंदिया, वडसा, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, चांदा फोर्ट ते बल्लारशाह याप्रकारे मध्य रेल्वे व दक्षिण, पूर्व, मध्य रेल्वेअंतर्गत मेरी गो राऊंड रेल्वे सेवा सुरू केल्याने चंद्रपूर, गडचिरोलीच्या विकासाला गती मिळेल. म्हणून ही सेवा सुरू करण्यासाठी त्वरित मंजुरी द्यावी. याशिवाय बाळू धानोरकर यांनी भद्रावती रेल्वे स्टेशन हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ व महत्त्वपूर्ण उद्योग असल्यामुळे बंद झालेले सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचे थांबे त्वरित सुरू केले आहे. अजूनही हेदराबाद- निजामुद्दीन, चेन्नई-लखनौ, बल्लारपूर-भुसावळ सेवाग्राम लिंक एक्स्प्रेस, ताडोबा एक्स्प्रेसल बल्लारपूर-मुंबई एक्स्प्रेस तसेच सिकंदराबाद येथून कागजनगरपर्यंत धावणारी भाग्यनगरी पॅसेंजर बल्लारशाह स्थानकापर्यंत सुरू करावी, याशिवाय अनेक महत्त्वपूर्ण मागण्या निवेदनाच्या माध्यमातून केल्या आहेत. याकडे संबंधित विभाग गांभीर्याने बघेल, अशी आशा आहे.
विदर्भ क्षेत्रासाठी मेरी गो राऊंड रेल्वे सेवा आता आवश्यकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 5:00 AM