राज्य शासनाने आरोग्य विभागातर्फे राज्यभरात गट ‘क’मध्ये २७२५ तर, गट ‘ड’मध्ये ३४६६ पदे भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. यासाठी राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. गट ‘क’साठीची परीक्षा २६ सप्टेंबरला नागपूर येथे तर गट ‘ड’साठी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर होणे अपेक्षित होते. तसे प्रवेशपत्रही परीक्षार्थ्यांना मिळाले होते. परीक्षा केंद्र वेळेत गाठण्याच्या उद्देशाने अनेक परीक्षार्थी २५ सप्टेंबरलाच नागपूर येथे पोहोचले होते. मात्र रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान परीक्षार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज धडकला. त्यामुळे परीक्षार्थी संतप्त झाले. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून शासनाच्या अशा निर्णयाबद्दल रोष व्यक्त केला.
बॉक्स
आमचे पैसे देणार कोण?
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ५०० ते १००० रुपयांपर्यंतचे चलान भरले. जिल्ह्यात परीक्षा घेण्यासाठी केंद्र उपलब्ध असतानाही गट ‘ड’साठी नागपूर परीक्षा केंद्र देण्यात आले. अनेकांनी परीक्षा केंद्र वेळत गाठण्यासाठी नागपूरचा प्रवासही केला होता. तर काही वाटेतच असताना त्यांना परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज धडकला. त्यामुळे विनाकारण प्रवासासाठी ५०० ते ६०० रुपयांचा भुर्दंड परीक्षार्थ्यांना बसला आहे. आमचे विनाकारण खर्च झालेले हे पैसे देणार कोण, असा प्रश्न हे परीक्षार्थी सोशल मीडियावर सरकारला विचारत आहेत.
कोट
माझा कनिष्ठ लिपिक पदाचा पेपर नागपूरला होता. वेळेवर पोहोचता येईल म्हणून मी आदल्याच दिवशी नागपूरला गेलो आणि परीक्षा रद्द झाल्याचे कळले. आई-वडिलांनी गरिबीचे ओझे दूर करण्यासाठी आम्हाला स्पर्धा परीक्षेत उतरविले. परंतु, या बिनडोक्याच्या सरकारने ऐनवेळी परीक्षा रद्द केली. जाण्या-येण्यासाठी जवळपास ६०० रुपये खर्च आला. ते पैसे आता कोण भरून देणार?
- सूरज गुरनुले, परीक्षार्थी
----
कोट
कोरोनामध्ये अनेक परीक्षा रद्द झाल्या. परंतु, देशावर ओढावलेले ते संकट असल्याने आम्ही समजू शकलो. परंतु, आता सर्व सुरळीत असताना परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून ऐनवेळी परीक्षा रद्द करणे म्हणजेच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी खेळ करणे होय. मीसुद्धा परीक्षेच्या दृष्टीने नागपूर येथे गेलेलो होतो. परीक्षा रद्द झाल्याने विनाकारण आर्थिक भुर्दंड बसला आहे.
- चेतन रामटेके, परीक्षार्थी