महिला व बालकल्याण समितीचे आयोजन : आठ संघांनी घेतला भागभद्रावती : नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती अंतर्गत नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित दांडिया उत्सव व स्पर्धांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला. या स्पर्धेचे आयोजन सेवादल मैदान येथे करण्यात आले होते. जिल्ह्यातील आठ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. कार्यक्रमस्थळी स्वच्छतेचा संदेश देणारे विविध फलक लावण्यात आले होते. तसेच शौचालयाचे महत्त्व सांगणारे फलक लावण्यात आले होते. दांडिया खेळणारे स्पर्धकसुद्धा स्वच्छता फलकाद्वारे संदेश देत होते. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. बाळू धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, डॉ. माधवी मिलमिले, महिला व बालकल्याण सभापती शारदा ठवसे, आरोग्य सभापती मीनल आत्राम, नगरसेविका रेखा खुटेमाटे, आशा निंबाळकर, बांधकाम सभापती प्रमोद गेडाम, प्रा. संजय आसेकर, विनोद वानखेडे, प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, सुधीर सातपुते आदी उपस्थित होते.प्रथम बक्षीस १५ हजार रुपये रोख व शिल्ड के.डी. ग्रुप गडचांदूर, द्वितीय १० हजार रोख व शिल्ड जे.एम.डी. ग्रुप गडचांदूर व तृतीय बक्षीस प्रिया ग्रुप पाच हजार रोख व शिल्ड आदींनी प्राप्त केले. वैयक्तिक उत्कृष्ट वेशभूषेचे बक्षीस भद्रावतीची स्नेहल कोलते तर सर्वोत्कृष्ट खेळाडूचे बक्षीस घोडपेठ येथील द्रुप वऱ्हाडे याला मिळाले. स्थानिक प्रशिक्षण घेणाऱ्यामध्य ेपहिले बक्षीस खुशी मरस्कोल्हे व दिव्या सिडाम, द्वितीय करिष्मा आत्राम व खुशी सिडाम तर तृतीय गायत्री ठाकरे व तन्वी कापसे यांना मिळाले. परीक्षक म्हणून नाफीस अहमद व आरती उपाध्याय आणि प्रशिक्षक म्हणून स्वप्निल डांगे यांनी काम पाहिले.या खेळाडूंना वेशभूषेचा खर्च येतो. त्यामुळे पुढील वर्षी बक्षीसांची रक्कम व संख्या वाढविण्याची सूचना आ. बाळू धानोरकर यांनी केली. तर नगराध्यक्ष अनिल धानोरकर म्हणाले की, क्रीडा सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून नगरपरिषदेद्वारे सातत्याने अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. १७ आॅक्टोबरला मागेल त्याला शौचालयाबाबत मेळावा घेण्यात येणार आहे. याप्रसंगी त्यांनी स्वच्छता तथा शौचालयाची माहिती दिली. नागरिकाननी प्लास्टिक वापरू नये. शौचालयाचा वापर करावा. कचरा घंटागाडीतच टाकावा, असेही त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
दांडियाच्या माध्यमातून नगर परिषदेने दिला स्वच्छतेचा संदेश
By admin | Published: October 15, 2016 12:54 AM