घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : पुरेसे काम उपलब्ध नसल्याने झाडीपट्टीतील मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. दिवाळीसाठी हे मजूर गावाकडे येत असले, तरी दिवाळीनंतर पुन्हा कामावर जात असल्याने यावर्षीच्या विधानसभेच्या मतदानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पूर्व विदर्भात नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होत असला, तरी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही या तालुक्यांना झाडीपट्टी म्हणून संबोधण्यात येते. झाडीपट्टीतील मुख्य आणि एकमेव पीक धानाचे असून, याच एका पिकावर झाडीपट्टीची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. मात्र, हे धान पीक झाडीपट्टीतील मजुरांना पुरेसा रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नसल्याने झाडीपट्टीतील मजूर दरवर्षीच रोजगारासाठी चापळीत म्हणजे नागपूर जिल्ह्यात स्थलांतर करीत असतात. काही मजुरांचे जत्थे तर वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत जातात, अशी माहिती आहे.
उलट वरील जिल्ह्यात बहुपीक पद्धती रूढ आहे. या जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, मिरची, धान यांसारखे विविध पीक घेतले जातात. मात्र, तेथे उपलब्ध असलेल्या पीक व शेतीनुसार मजूर उपलब्ध होत नसल्याने या जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षीच झाडीतील मजुरांना कामासाठी बोलवत असतात.
सध्या सोयाबीन काढण्याचे काम सुरू झाले. सोयाबीन सवंगण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असल्याने अनेक मोठे शेतकरी ओळखीच्या मजुरांकडे निरोप देऊन गेले. या निरोपांवरून नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुक्यातील शेकडो मजूर उमरेड, भिवापूर तालुक्यात सोयाबीन सवंगण्यासाठी रवाना झाले आहेत. कापूस आणि मिरचीचा हंगाम सुरू झाला की, असेच मजूर या हंगामासाठी नेहमीच जात असल्याचे दिसून येते.
वाहनांचीही सोय ज्या मजुरांना मुक्कामी राहणे शक्य नाही, अशा मजुरांसाठी वाहनांचीही सोय करण्यात येत आहे. हे मजूर या वाहनांनी ये-जा करीत आहेत. काही गावांत, तर मजुरांची ने-आण करणारी वाहनेच तयार झाली हे शक्यतो भिवापूर, उमरेड तालुक्यापर्यंत मजुरीसाठी जात असतात.
मतदानावर पडणार फरक रोजगारासाठी स्थलांतर केलेले हे मजूर दिवाळीसाठी घरी येत असतात. मात्र दिवाळी झाली की, पुन्हा त्यांचे स्थलांतर सुरु होते. यावेळी स्थलांतराची गती थोडी अधिक असते, जे आहेत, तेही शतकारी स्वतःच्या अलापधारका आज ही रोजगारासाठी स्थलांतर करीत असतात.
अपघात होतात तरीही... मजुरांची ने ने-आण करणाऱ्या वाहनांचे अनेकदा अपघात झाले आहेत. सात महिन्यांपूर्वी उमरेड तालुक्यात झालेल्या अपघातात ब्रह्मपुरी तालुक्यातील माहेर येथील ४ महिलांचा जागीच मृत्यू झाला होता, तर याच आठवड्यात नागभीड तालुक्यातील डोंगरगाव येथील एक महिला ठार, तीन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. अशा घटना डोळ्यादेखत घडूनही पोटाची खळगी भरण्यासाठी अशी जोखीम पत्करावी लागत आहे.