आशीष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : ‘जय जवान जय किसान, पाटाच्या पाण्यावर व्हा बलवान’ पाटबंधारे विभागाकडून अशाप्रकारचा संदेश अनेक ठिकाणी लावलेला दिसून येतो. मात्र पाटबंधारे विभागाच्या अनियोजितपणामुळे कालव्यांची नियमित डागडुजी होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अपव्यय होत असून लाखो लिटर पाणी नाल्याने बाहेर वाहून जाताना दिसत आहे.कोरपना तालुक्यात अमलनाला व पकडीगुड्डम असे दोन सिंचनाचे प्रकल्प असून शेकडो हेक्टर शेतीचे सिंचन या दोन्ही धरणावर अवलंबून आहे. मात्र पाटबंधारे विभागाचे शेतकऱ्यांच्या सिंचनाकडे पूर्णत: दुर्लक्ष असून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, याकरिता पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. उन्हाळ्यामध्ये नियोजन करून फुटलेले कालवे व्यवस्थित करणे, अनावश्यक पाणी वाहून जात असलेल्या ठिकाणी सुधारणा करणे, शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांची समस्या समजून घेणे यापैकी कोणतीही गोष्ट करताना पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आढळत नाही. शेतकरी आणि पाटबंधारे विभागाचे कर्मचारी यांचा संवाद संपल्यामुळे अशाप्रकारे पाटाच्या पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. कोरपना तालुका हा कापूस, सोयाबीन, गहू, तुरी, मिरची अशा विविध पिकांसाठी प्रसिद्ध असला तरी अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही सिंचनाची व्यवस्था नाही. निसर्गाच्या कृपेने अमलनाला व पकडीगुड्डम या धरणामुळे सिंचनाची व्यवस्था होईल, या आशेने असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी नेहमी निराशाच येते.शेतापर्यंत पाटाचे पाणी पोहोचत नाही. मध्येच कालवे लिकेज होतात. काही शेतकऱ्यांनी बांध टाकून पाट फोडून टाकले. मात्र अशा शेतकऱ्यांवर पाटबंधारे विभागाकडून कधीही कारवाई झाल्याचे ऐकण्यात नाही.गडचांदूरकडून बिबी मार्गे नांदा जाणाऱ्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाटाचे पाणी वाहत आहे. बिबी येथे असणारा बंधारा पूर्ण भरला असून पावसाळ्याचे पाणी असल्यासारखी स्थिती नाल्यामध्ये पाटाच्या पाण्यामुळे दिसून येत आहे. हेच पाणी शेतकऱ्यांना शेतीमध्ये सिंचनाची व्यवस्था करून देण्याकरिता उपयोगी आले असते तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा झाला असता. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.गडचांदूर पाटबंधारे विभागाचा पाट आमच्या शेतापर्यंत पोहोचला आहे. मात्र पाटाचे पाणी पोहोचले नाही. सर्व पाणी बाहेर वाहून चालल. मात्र आमच्या शेताला पाणी नाही. त्यामुळे शेत कोरडे पडून पिकांचे नुकसान होत आहे.- पंडित ढवस शेतकरी, बिबी
अमलनाला धरणातील लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:54 PM
‘जय जवान जय किसान, पाटाच्या पाण्यावर व्हा बलवान’ पाटबंधारे विभागाकडून अशाप्रकारचा संदेश अनेक ठिकाणी लावलेला दिसून येतो. मात्र पाटबंधारे विभागाच्या अनियोजितपणामुळे कालव्यांची नियमित डागडुजी होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोडण्यात येणाºया पाण्याचा अपव्यय होत असून लाखो लिटर पाणी नाल्याने बाहेर वाहून जाताना दिसत आहे.
ठळक मुद्देकालव्यांची डागडुजी नाही : सिंचनाचे पाणी नाल्यात