पाणीपुरवठा योजना पांगळी : भूगर्भातील पाण्याची पातळी खालावलीचंद्रपूर: चंद्रपूर शहरासाठी असलेली पाणीपुरवठा योजना पांगळी असल्याने भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा होत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वेगाने खालावत चालली आहे. नजीकच्या काळात उपाययोजना करण्यात न आल्यास चंद्रपूरचे लातूर होण्यास वेळ लागणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर शहरात विविध स्त्रोताद्वारे दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा होतो. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वेगाने खालावत आहे. शहरात जवळपास ८० हजार घरे आहेत. शहरासाठी असलेली पाणी पुरवठा योजना सक्षम नसल्याने शहरातील किमान ३५ हजार घरांमध्ये विहिरी, ट्यूबवेल, हातपंप यासारखे पाण्याचे स्त्रोत आहेत. चंद्रपुरात असलेली पाणीपुरवठा योजना सन १९६४ ला कार्यान्वित झाली. त्यावेळी शहराची लोकसंख्या केवळ एक लाखापर्यंत होती. ही लोकसंख्या लक्षात घेऊन सदर योजना कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र लोकसंख्येचा विस्तार पाहता १९८५ मध्ये चंद्रपूर शहरासाठी सुधारित नळयोजनेला मंजुरी देण्यात आली. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ही योजना पुर्णत्वास येऊ शकली नाही. १९९६ पुन्हा नळयोजना मंजूर झाली. मात्र तीदेखील विविध कारणांनी रेंगाळली. चंद्रपूर शहराची लोकसंख्या वेगाने वाढली. आज घडीला चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात आहे. मात्र ४२ वर्षे जुन्या पाईनलाईनच्या आधारेच पाणी पुरवठा केला जात आहे. ही योजना अतिशय दुबळी झाली असून या नळयोजनेद्वारे पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांनी स्वत:च्या सोईसाठी आपल्या घरी ट्यूबवेल, हातपंप विहीरी खोदल्या. त्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू आहे. प्रत्येक कुटुंबाला दररोज एक हजार लिटर पाण्याची गरज लक्षात घेता, शहरातील किमान ३५ हजार घरांमधून विविध स्रोताद्वारे दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जात आहे. नव्या वसाहती तहानलेल्याचचंद्रपूरची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराच्या आसपास नव्या वसाहती उभ्या झाल्या आहेत. मात्र या नव्या वसाहतीपर्यंत नळयोजनेचे पाणी अद्यापही पोहचले नाही. जमिनीतील पाण्यात मोठ्या प्रमाणावर क्षार असल्याने ते पिण्यायोग्य नाही. त्यामुळे या नव्या भागातील नागरिकांना दूरवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. अमृत कलश योजनेची प्रतीक्षाकेंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त नियोजनातून अमृत कलश योजना उदयास आली आहे. सामान्यांना मुबलक पाणी मिळावे या हेतून ही योजना चंद्रपुरातही कार्यान्वित करण्यात येणार आहे. मात्र ही योजना नेमकी कधी कार्यान्वित होईल, हे आताच सांगता येणार नाही. योजना कार्यान्वित करण्यासाठी महानगर पालिकास्तरावर कार्यवाही केली जात आहे. ही योजना चंद्रपुरात कार्यान्वित झाल्यास पाणी वितरण व्यवस्था सक्षम होऊन प्रत्येकाला मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. कोळसा खाणींमुळे घटतोय जलस्तरचंद्रपूर शहराला कोळसा खाणींचा वेढा आहे. पद्मापूर, लालपेठ, माना आदी कोळसा खाणींचा परिणाम भूगर्भातील जलसाठ्यावर होत आहे. कोळशामुळे जमिनीत उष्णता तयार होत असल्याने भूगर्भातील जलस्तर वेगाने घटत चालला आहे. इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा होतो. धरणामध्ये पाणी मुबलक आहे. परंतु शहरातील वितरण व्यवस्था दुबळी ठरली आहे. शहरातील पाईप लाईनचे जाळे खूप जुने आहे. लोकसंख्या वाढल्याने नळजोडणीही मोठ्या प्रमाणात झाली. परंतु अजुनही कमी व्यासाच्या पाईप लाईनमधूनच पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेवर ताण येत आहे. काही लोकांना मुबलक पाणी तर अनेकांच्या नळाला पाण्याचा थेंबही येत नाही. ही परिस्थिती बदलविण्यासाठी शहरात सक्षम पाणी वितरण व्यवस्था आवश्यक आहे. यासंदर्भात मी स्वत: पाठपुरावा केला आहे. लोकप्रतिनिधींशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे.- संजय वैद्य, संयोजक, जल बिरादरी
चंद्रपुरात लाखो लिटर पाण्याचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2016 12:45 AM