गोंडपिपरी :
तालुक्यातील मौजा नांदगाव रेती घाटावरून गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड प्रमाणात वाळू तस्करी केल्या जात असून स्थानिक अधिकाऱ्यांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास खनिकर्म विभागाने या घाटावर धाड टाकून दोन ट्रॅक्टर जप्त केले.
गोंडपिपरी तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने स्थानिक महसूल अधिकाऱ्यांशी संबंध प्रस्थापित करून गेल्या अनेक महिन्यांपासून रेती चोरीचा गोरखधंदा चालविला आहे. याला जोड म्हणून काही इतरही रेती माफियांनी यात हिस्सेदारी भूमिका घेत स्थानिक महसूल अधिकाऱ्यांची संगणमत करून रात्रपाळी पोकलॅण्ड मशीनद्वारे तसेच ट्रॅक्टरच्या साहाय्याने नदीपात्रातून रेती उत्खनन करून अवैधरित्या रेतीचा पुरवठा केल्या जात असल्याची माहिती खनिकर्म विभाग चंद्रपूर यांना मिळताच विभागाच्या चमूने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नांदगाव रेती घाटावर धाड टाकली व रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले. याप्रसंगी काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार घाटावर पंधराहून अधिक ट्रॅक्टरच्या साहाय्याने उत्खनन सुरू होते. मग इतर ट्रॅक्टर गेले कुठे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.