मागणी : ताडोबा भ्रमंतीसह किल्ला-स्मारके-मंदिरांचे दर्शन, खाण पर्यटनही सुरु करा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरात ताडोबा (व्याघ्र-निसर्ग पर्यटन), चंद्रपूर किल्ला-समाधी (ऐतिहासिक पर्यटन), प्राचीन मंदिरे (धार्मिक पर्यटन) यासह वेकोलिद्वारे खाण पर्यटन सुरू करून चंद्रपूर शहरात एक संपूर्ण पर्यटन झोन निर्माण करावा, अशी मागणी ‘वेकोलि’चे क्षेत्रीय महाव्यवस्थापक आभास चंद्र सिंग यांच्याकडे ‘इको-प्रो’चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे.
जिल्ह्यामध्ये विपुल वन संपत्तीसह खनिज संपत्ती आहे. त्यामुळे येथे ‘वेकोलि’च्या कोळसा खाणी आहेत. यात खुल्या आणि भूमिगत अशा दोन्ही पद्धतीच्या कोळसा खाणींतून कोळशाचे उत्खनन केले जाते. या उत्खननासाठी अवजड यंत्रसामुग्रीसह अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही कोळसा उत्खननाचे काम सुरू आहे. पूर्वीच्या काळी कोणतेही तंत्रज्ञान अवगत नसताना आणि सुरक्षेची पुरेशी साधने नसताना धोकादायक अशा ठिकाणी मजूर जिकरीचे काम करत होते. काही प्रमाणात आजही हे काम सुरू आहे. मजुरांच्या या कौशल्याबद्दल व भूगर्भातील अंतरंगाबाबत जाणून घेण्यास सामान्य माणूस उत्सुक असतो. मात्र, सुरक्षेच्या कारणासह व नियमांमुळे सर्वसामान्यांकरिता या खाणी म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र असतात. त्यामुळे येथे चालणारी उपकरणे, सुरक्षा, कार्यपद्धती, आपत्कालिन व्यवस्था, निवारण याबाबत सामान्य माणासांना आजही कुतूहल आहे. शेजारी कोळसा खाणी असूनही त्याबद्दल सामान्य नागरिक, विद्यार्थी व अभ्यासकांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे भविष्यात खाण पर्यटन सुरू झाल्यास अभ्यासकांच्या दृष्टीने तसेच चंद्रपुरातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने ते सोयीचे होईल, असेही ‘इको-प्रो’कडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी क्षेत्रीय महाव्यवस्थापक आभास चंद्र सिंग यांच्याशी ऐतिहासिक स्मारक पर्यटनाविषयी चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान ‘इको-प्रो’च्या किल्ला स्वच्छता व सुरू असलेल्या किल्ला पर्यटनाविषयी सिंग यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी आभास चंद्र सिंग यांनी स्वतः किल्ला पर्यटन हेरिटेज वाॅकला येण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी ‘इको-प्रो’चे नितीन रामटेके व ‘वेकोलि’चे प्रशांत कुडे उपस्थित होते.
Attachments area