चंद्रपूर : रानडुकराच्या हल्ल्यातील जखमीला पाहण्यासाठी चक्क रविवारी रात्री १२ वाजता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे थेट चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचल्याने रुग्णालय प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील आरोग्यसेवेकडेही लक्ष देत सुविधांबाबतही माहिती जाणून घेतली. चक्क मंत्री रुग्णाला पाहण्यासाठी आले ही बाब रुग्णाच्या नातेवाइकांना दिलासा देणारी ठरली.
राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील शेतकरी अजय नत्थू कार्लेकर याला २ सप्टेंबरला शेतात काम करताना रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले. या रुग्णाला राजुरा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी मंत्री मुनगंटीवार यांनी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्यासह या रुग्णाला पाहण्यासाठी चक्क रात्री १२ वाजता आपला दौरा आटोपून भेट दिली. अचानक मंत्री आल्याचे पाहून रुग्णालयातील व्यवस्थापनाची चांगलीच भंबेरी उडाली.
यावेळी रुग्णावर योग्य उपचाराच्या सूचना देतानाच उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांना नियमांनुसार वेळेत जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रभारी तहसीलदार गांगुर्डे, वनपरिक्षेत्र अधिकारी येल्केवाड, कैलाश कार्लेकर, मत्स्य व्यवसाय संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर पचारे, माजी अध्यक्ष संजय कार्लेकर, घनश्याम कार्लेकर, संदीप पारखी, रत्नाकर पायपरे उपस्थित होते.