पळसगाव (पि) : भारताच्या सामाजिक व्यवस्थेत लोककला या समाज मनाचा आरसा असून ते केवळ मनोरंजनाचे आणि प्रबोधनाचे साधन नाही, असे मत प्रख्यात साहित्यिक व कवी ॲड. भूपेश वामनराव पाटील यांनी व्यक्त केले.
चिमूर तालुक्यातील खापरी डोमा येथे आंबेडकरी लोककला महोत्सवाचे आयोजन प्रसिद्ध साहित्यिक व कवी ॲड. भूपेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी यावेळी प्राचीन लोककलांचे प्रकार, आधुनिक लोककला प्रकार, स्वातंत्र्य पूर्वकाळातील लोककलावंत शाहीर, लोककलांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. तसेच लोककला आणि लोककलावंत यांना सन्मान प्राप्त करून देण्याची सामाजिक जबाबदारी सर्वांनी स्वीकारण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली.
या आंबेडकरी लोककला महोत्सवाला संपूर्ण विदर्भातील लोककलावंत शाहीर, वादक इत्यादी मंडळी सहभागी झाली होती. महोत्सवाचे उदघाटन प्रा. पुष्पा घोडके यांनी केले. याप्रसंगी प्रा. प्रवीण कांबळे, प्रा. अनमोल शेंडे, सुनंदा रामटेके, शाहीर धर्मदास भिवगडे, लोकनाथ शेंडे व मुख्य आयोजक व लोककलांचे अभ्यासक प्रा. आत्माराम ढोक उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात विदर्भातील प्रसिद्ध कवी सुरेश डांगे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. कवी खेमराज भोयर यांनी बहारदार संचालन केले.