सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यात धान पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. तालुक्यात तलावाची संख्याही बरीच आहे. येथे भात संशोधन केंद्र, विभागीय कृषी संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र आहे. तसेच घोडाझरी सिंचन उपविभाग, जिल्हा परिषद सिंचन उपविभागीय कार्यालये आहेत. मात्र योग्य नियोजनाचा अभाव असल्यामुळे या तालुक्यातील शेतकरी दारिद्रय़ाच्या गर्तेत सापडला आहे. या तालुक्यातील शेती निसर्गावरच अवलंबून आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतवृष्टी तर कधी अकाली पाऊस यामुळे दरवर्षी धान पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. सिंदेवाही तालुक्यात एकही मोठा उद्योग नाही व सिंचन प्रकल्प नाही. हुमन सिंचन प्रकल्प वन विभागामुळे २५ वर्षापासून थंडबस्त्यात पडून आहे. तर गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या नहराचे काम रेंगाळत चालले आहे. घोडाझरी सिंचन उपविभागांतर्गत गडमौशी तलाव आहे. १0 वर्षापूर्वी गडमौशी तलावाच्या नहराद्वारे परिसरातील १२00 एकर शेतजमिनीला पाणी पुरवठा होत होता. आता मात्र ७५0 एकर शेतजमिनीला पाणी पुरवठा होत आहे. पावसाळ्यात पडणार्या पावसामुळे पाण्यासोबत गाळ-माती वाहन येत असते. यामुळे तलावातील पाण्याच्या साठवणूक क्षमतेत घट झालेली आहे. गडमौशी तलावाअंतर्गत नहराचे पाणीही आटत चालले आहे. गडमौशी तलावाच्या नहरातील गाळ उपसला जात नसल्यामुळे तलावात मुबलक प्रमाणात पाणी साठविले जात नाही. गडमौशी तलावाचे नहर नादुरुस्त आहेत. नहरामध्ये पावसाळ्यात गवत मोठय़ा प्रमाणात वाढत असल्यामुळे पाण्याचे योग्य प्रकारे वाटप होत नाही. पाणी वाटप समिती योग्य प्रकारे पाणी वाटप करीत नाही, असा शेतकर्यांचा आरोप आहे. नहराद्वारे पाण्याचे योग्य प्रकारे वाटप होत नसल्यामुळे पावसाळ्यात वेळेवर शेतकर्यांना पाणी मिळत नाही. तसेच सिंदेवाही तालुक्यात जिल्हापरिषद सिंचाई उपविभाग सिंदेवाही अंतर्गत २४0 माजी मालगुजारी तलाव, १८ कोल्हापुरी बंधारे व दोन लघुपाटबंधारे तलाव आहेत. तालुक्यात मोठय़ा प्रमाणात तलाव असूनही तालुक्यातील शेतकरी जलसिंचनाअभावी तोट्यात सुरू आहे. माजी मालगुजारी तलाव आधीपासून पडित जागेवर आहेत. तलावाची स्थिती दयनीय आहे. बरेच मामा तलाव खोल नसून उथळ आहेत. त्यामुळे तलावात पाण्याचा साठा अल्प प्रमाणात राहतो. काही तलावाचे खोलीकरण झालेले नाही. तलावाची सिंचन क्षमता वाढविण्याकरिता तलावाचे खोलीकरण व नहराची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जलसिंचनाअभावी या तालुक्यातील शेतकर्यांना दरवर्षी दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. असे असले तरी सिंचन विभाग मात्र मूग गिळून आहे. (तालुका प्रतिनिधी)
शेतकर्यांची सिंचनाअभावी दैनावस्था
By admin | Published: May 22, 2014 12:58 AM