चंद्रपूर : गतवर्षी पडलेल्या ओल्या दुष्काळामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली. परंतु, त्यामध्येही कृषी अधिकारी व तलाठी यांनी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत दिली. त्यामुळे परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्याा धोरणामुळे मदतीपासून वंचित राहावे लागले आहे. शासनाने मदत जाहीर केली. मात्र, भरीव मदत न मिळाल्याने तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार शासनाने केला आहे. दुष्काळाचे सर्वेक्षण करताना कोणत्याही अधिकाऱ्याने शेतावर न जाता कार्यालयात व घरी बसून सर्वेक्षण केले. त्यामुळे बरेच शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले नाव दिले, त्या शेतकऱ्यांची कोणतीही चौकशी न करता त्यांना चुकीच्या पद्धतीने नुकसान भरपाई दिली आहे.यात कृषी अधिकारी व तलाठी यांची मिलीभगत असल्याचा आरोप होत आहे. मागील वर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेतकरी तहसील कार्यालयात चौकशीला गेले असता, शेतकऱ्यांचे चार कोटींचे अनुदान प्राप्त व्हायचे असल्याने शेतकऱ्यांना मदत वाटप करायची असल्याचे सांगितले जात आहे. अनुदान प्राप्त होताच, मदत वाटप वितरीत करण्यात येईल, असे तहसील कार्यालयाकडून सांगितले जात आहे. एक वर्षाचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. मग शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आलेला निधी गेला कुठे, याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबतत तत्काळ चौकशी करुन शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करुन शेतकऱ्यांचा नुकसानभरपाईची मदत देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
चुकीच्या पद्धतीने नुकसान भरपाईचे वाटप
By admin | Published: June 23, 2014 11:46 PM