चंद्रपूर : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांच्यातील आवडी-निवडी ओळखून त्या-त्या विषयांमध्ये अधिक सखोल ज्ञान मिळावे यासोबतच जिल्ह्यात भविष्यात स्पर्धा परीक्षेचा टक्का वाढावा यासाठी जिल्ह्यात ‘मिशन गरुडझेप-२०२१’ हा पायलट प्रोग्राम जिल्हा परिषद सीईओ मिताली सेठी यांनी राबविण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सुपर-६० सदस्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या ६० जणांना प्रथम आपल्या शाळांमध्ये गुणवत्तेसाठी काय प्रयत्न केले, याचे सादरीकरण दर महिन्यांत सीईओंसमोर करावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी त्यांना योग्यवेळी आणि योग्य वयात संस्कार करणे गरजेचे आहे. बालवयामध्ये त्यांच्यामध्ये शिक्षणाबाबत अधिक महत्त्व पटवून देत त्यांच्यातील बुद्धिमत्तेला चालना देणे गरजेचे आहे. त्याच उद्देशाने मिशन गरुडझेप प्रयत्न करणार आहे. विशेषत: मूलभूत क्षमता, अध्ययन निष्पत्ती तसेच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांना ओळखून त्या-त्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. एकूण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ‘मिशन गरूडझेप’-सुपर ६० सदस्य प्रयत्न करणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
बाॅक्स
सीईओंसमोर गुणवत्ता करावी लागणार सिद्ध
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी सुपर-६० गटातील सदस्यांना प्रथम आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. गुणवत्तेसाठी महिनाभरात काय प्रयत्न केले. याबाबत सीईओंसमोर सादरीकरण करावे लागणार आहे. त्यामुळे आता काही शिक्षक कामालासुद्धा लागले आहे.
बाॅक्स
स्पर्धा परीक्षेसाठी घडणार विद्यार्थी
जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये काही कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहेत. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने ते स्पर्धा परीक्षांपासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांना ओळखून त्यांच्यातील गुणवत्ता तपासून त्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेषत: प्रज्ञाशोध, नवोदय यासोबतच भविष्यातील एमपीएससी, युपीएसई स्पर्धा परीक्षा कशा द्यायच्या याबाबत त्यांना प्राथमिक शिक्षणापासून मार्गदर्शन केले जाणार आहे.
बाॅक्स
गावागावांत राहणार वाचनालय
गुणवत्ता वाढविणे म्हणजेच एकूण विद्यार्थ्यांची प्रगती साध्य करणे, यासाठी वाचन, लिखाणाची आवड निर्माण करण्यासाठी गावागावांत वाचनालय स्थापन करून या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निमार्ण करण्यात येणार आहे. वाचनालयामध्ये दैनिक, साप्ताहिके, पाक्षिक आणि मासिके ठेवण्याबाबतची ‘सुपर-६०’ सदस्यांनी बैठकीप्रसंगी सांगितले आहे.
कोट
मिशन गरुडझेप अंतर्गत सुपर-६० शिक्षण तज्ज्ञ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात गुणवत्ता वाढीसोबतच विद्यार्थ्यांचा एकूणच सर्वांगीण विकास करण्यावर भर राहणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना विश्वासात घेऊन गावांमध्ये वाचनालय, स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी तयार करण्यात येणार आहे.
-मीताली सेठी
मुख्य कार्यपालन अधिकारी, जि. प. चंद्रपूर