शेतकरी आर्थिक विवंचनेत : धान खरेदीचे पैसे तत्काळ द्यावे
शंकरपूर : महाराष्ट्र शासन आधारभूत खरेदी योजनेंतर्गत चिमूर तालुक्यात खरेदी करण्यात आलेल्या धान पिकाचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. तसेच कर्जाची परतफेड कशी करायची, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ धान खरेदीचे चुकारे द्यावे, अशी मागणी आहे.
चिमूर तालुका हा धान उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासन आदिवासी विकास महामंडळातर्फे मोटेगाव खांबाळा बोडधा, डोमा, आंबेनेरी, मासळ, टेकेपार, अडेगाव येथे आदिवासी सहकारी संस्थेला धान खरेदी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. या सर्व खरेदी केंद्राला ७० गावे जोडण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे चिमूर व नेरी येथे धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या सर्व ठिकाणी जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी धान विकलेला आहे. आधारभूत भाव व बोनस मिळणार असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर धान विकलेले आहेत. परंतु मागील एक ते दीड महिन्यापासून या शेतकऱ्यांचे चुकारे देण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे शेतकरी या संस्थेच्या सचिवांना वारंवार भेटून पैसे कधी येणार, हा प्रश्न विचारत आहे.
बॉक्स
पीक कर्ज कसे फेडायचे?
३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांना पीक कर्ज भरायचे असते. परंतु मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा आला तरी अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नसल्यामुळे कर्ज कसे फेडायचे, या प्रश्नाने त्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे आधारभूत भाव व बोनसची रक्कम शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे