पोंभुर्णा : परिसरातील अनेक गावात गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने, शौचालयाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे.
कृषिपंपाच्या बिलात दुरुस्ती करावी
भद्रावती : वीज वितरण कंपनीच्या वरोरा उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वरोरा व भद्रावती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना चुकीचे वीजबिल देण्यात आले, शिवाय काही शेतकऱ्यांच्या कृषिपंप वीज जोडणीची प्रक्रियाही प्रलंबित आहे. मनमानी देयक पाठविल्याने शेतकऱ्यांनी भरणा केला नाही. त्यामुळे आधी बिलात दुरुस्ती करावी. त्यानंतरच भरणा करू, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बस वेळापत्रक नसल्याने प्रवाशांची गैरसोय
गडचांदूर : चंद्रपूर-आदिलाबाद राज्यमार्गावर असलेल्या काही बस थांब्यावर बस वेळापत्रक फलक लावण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. येथून आदिलाबाद, नांदेड, कोरपना, परसोडा, चंद्रपूर, राजुरा आदी शहरांकडे बसेस नियमित धावतात.
अवैध वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता
जिवती : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्याचा एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
बाराजारातील कचरा हटविण्याची मागणी
गडचांदूर : येथील रेल्वे फाटकाजवळ असलेला कचरा डेपो बंद करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मागील काही दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला असून, स्वच्छतेची मागणी केली आहे.
बुद्धगुडा गावातील समस्या सोडवा
जिवती : तालुक्यातील बुद्धगुडा हे गाव अनेक समस्यांनी ग्रासले आहे. या गावात अजूनही योग्य रस्ते नाही. त्यामुळे गावातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिमायतनगर ते बुद्धगुडा येथील समस्या सोडवाव्या, तसेच रस्ता तयार करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
परवाना शिबिराची गरज
सावली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूकविषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरूण ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून आजवर जिल्ह्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टर चालकांसाठी परवाना शिबिर भरविण्याची गरज आहे. पूर्वी असे शिबिर राबविण्यात येत होते.
तोट्यांअभावी पाणी वाया
राजुरा : येथील नागरिकांकडे नळ आहेत, परंतु काही नागरिकांच्या नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे ओव्हर फ्लो झाल्यानंतर, तसेच पाणी भरून झाल्यानंतर उर्वरित पाणी वाया जाते. स्थानिक प्रशासनाने प्रत्येक नागरिकांच्या नळाला तोट्या लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी आहे.
पुलावर कठडे नसल्याने अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जडवाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला, परंतु कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे.
पदोन्नतीचा प्रश्न अजूनही प्रलंबित
वरोरा : नगरपरिषदेंतर्गत कार्यरत स्वच्छता कामगारांची शैक्षणिक पात्रता असताना पदोन्नती देण्यात आली नाही, असा आरोप होत आहे. कर्मचाऱ्यांना पदोन्नतीअभावी केवळ स्वच्छता कर्मचारी म्हणून वर्षानुवर्षे काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे.
निधीअभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत
कोरपना : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काही कोंडवाड्यांचे छप्पर उडून गेले असल्याची स्थिती आहे.
शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी
जिवती : आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी बांधवासाठी विविध योजना राबविण्यात येतात. यंदा कोरोनामुळे योजनांसाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात योजनाच पोहोचल्या नाही. राज्य शासनाने निधीची तरतूद करून जिल्ह्यासाठी देण्याची मागणी आदिवासी संघटनांनी निवेदनातून केली आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.