राजेश भोजेकर
चंद्रपूर : चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे गुवाहाटीला तातडीने जाऊन शिवसेनेचे बंडखोरे नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आहेत. या गटात सामील होण्यासाठी त्यांच्यावर शिंदे गटाकडून प्रचंड दबाव असल्याची चर्चा आतील गोटात सुरू आहे. यावरून इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था जोरगेवारांची झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
किशोर जोरगेवार हे २४ जून रोजी चंद्रपुरातून सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी निघाले. या जाण्यामागेही मोठे राजकारण घडल्याची बाब आता पुढे आली आहे. जोरगेवार यांच्या संपर्कात शिंदे गट होता. मात्र मतदारसंघातील एकूणच स्थिती बघता शिवसेनेचे बंडखोर आमदार ज्या पक्षासोबत नवे सरकार स्थापन करेल. त्या सरकारमध्ये आपण सहभागी व्हायला तयार आहे, तोपर्यंत आपण मतदार संघात राहणार, अशी भूमिका जोरगेवारांनी घेतली होती, ही बाबही आता चर्चिली जात आहे. परंतु शिंदे गटाला आपले संख्याबळ वाढवायचे असल्याने आमदार जोरगेवारांना आताच येत असाल तर यावे नाही तर, सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्हाला फारसे महत्त्व दिले जाणार नसल्याचे कळविण्यात आल्याचेही बोलले जात आहे. अशा प्रस्तावामुळे आमदार जोरगेवर यांची चांगलीच अडचण झाली.
नवे सरकार स्थापन झाल्यास आपल्याला मतदारसंघात कामे करण्यासाठी निधी मिळणार नाही. नव्या सरकारमध्ये आपले महत्त्वही उरणार नाही, ही भूमिका घेत जोरगेवार यांना एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा आहे.
तत्पूर्वी आमदार जोरगेवार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना मतदार संघात आणलेल्या निधीचा पाढा वाचणारे पत्रक प्रसिद्धीला दिले. तसेच महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात येईल, असा अंदाज बांधून सत्तेसोबत राहिले तरच मतदारसंघाचा विकास करता येईल, हे कारण पुढे करून जोरगेवार यांनी अखेर शिंदे गटाचा प्रस्ताव मान्य करीत गुवाहाटी गाठल्याची चर्चा आहे.