संभाजी भिडेंविरोधात आमदार विजय वडेट्टीवारांची पोलिसांत तक्रार
By राजेश भोजेकर | Published: July 31, 2023 01:50 PM2023-07-31T13:50:16+5:302023-07-31T13:52:07+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप
चंद्रपूर : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे 27 जूलै रोजी एका सभेमध्ये मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी ब्रम्हपुरी पोलिसांत दिली आहे.
संभाजी भिडेनी सभेत केलेल्या वक्तव्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी हे करमचंद गांधी यांचे पुत्र नसून एका मुस्लिम धर्मीय इसमाचे पुत्र असल्याचे सांगितले आहे. त्या वक्तव्यात महात्मा गांधी व त्यांच्या आईच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडवले आहेत. महात्मा गांधी हे केवळ भारताचा सन्मान नसुन संपुर्ण जगाचा सन्मान आहेत. संपुर्ण जगात महात्मा गांधी यांच्या व्यक्तीमत्वाचा अभ्यास केला जातो. त्यांनी संपुर्ण जगाला शांती, अहींसा, प्रेम याचा संदेश दिला म्हणून 2007 पासून संयुक्त राष्ट्रसंघाने 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती जागतीक अहिंसा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार संपूर्ण जग गांधी जयंतीला जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करते. महात्मा गांधी यांच्या व्यक्तीमत्वाचा अनेक महान विभूतीवर प्रभाव होता.
महान वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी महात्मा गांधी हा केवळ हाडामासाचा माणूस नसून जीवंत विचार आहे असे सांगितले होते. अशा महान विभूतीबद्दल संभाजी भिडे यांनी काढलेले उद्गार हे महात्मा गांधी यांना मानणाऱ्या करोडो अनुयायांमध्ये असंतोष निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने अनेक भारतीयांच्या मनात भिडे विरोधी निषेधाची भावना आहे. समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करणे. द्वेष भावना कलुषित करणे. जातीय दंगली घडाव्यात यासाठी तरुणांना प्रेरित करणे असे कृत्य सदर गृहस्थ नेहमीच करीत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी ब्रम्हपूरी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.
तक्रार देतेवेळी त्यांच्या सोबत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, न.प. आरोग्य सभापती अॅड. बाला शुक्ला, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सोनू नाकतोडे, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमीत कन्नाके यांसह अन्य काॅंग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.