चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात मागील पाच वर्षांत २५९ कोटी २५ लाख रुपयांची १८ हजार ९०४ विविध कामे करण्यात आलीत. यातून एक कोटी १९ लाख ६१ हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती झाली आहे.मनरेगाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांमध्ये सिंचन विहीरी, शौचालय, गाय व शेळ्यांचा गोठा, शेततळे, कृषी विषयक कामे, शेतीची बांधबंधीस्ती व दुरुस्तीची कामे तर सार्वजनिक लाभाच्या कामांमध्ये वनिकरण, वृक्ष लागवड, शेत रस्ते, पांदण रस्ते, जलसंधारण, जलसंवर्धनाची कामे, गाळ काढणे, सिमेंट रस्ते, राजीव गांधी सेवा सदन केंद्र व क्रीडागंणाची कामे यासारख्या कामांचा समावेश आहे.मनरेगाची विविध कामे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात झालीत. सर्वाधिक सहा हजार ६८२ कामे सन २०१२-१३ मध्ये करण्यात आलीत. यावर्षी तीन हजार ९९५ कामे करण्यात आली असून यातून २९ लाख ६६ हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती झाली आहे. मागील पाच वर्षांत अकुशल कामावर १८७ कोटी १३ लाख, कुशल कामावर ५८ कोटी ५५ लाख तर प्रशासकीय कामावर १३ कोटी ५७ लाख रुपये खर्च करण्यात आले. (प्रतिनिधी)
मनरेगाने गाठले रोजगार निर्मितीचे कोटींचे उड्डाण
By admin | Published: July 16, 2014 12:05 AM