चंद्रपूर : शहरात अमृत योजनेचे काम सुरू आहे. यामुळे रस्ते खोदण्यात आले असून, ते कंत्राटदाराकडून व्यवस्थित बुजविले जात नसल्यामुळे शहरात खड्डेच खड्डे पडले आहेत. कंत्राटदारावर कारवाई करावी, शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजावावेत आदी मागण्या घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. खड्ड्यांचा व चिखलाचा त्रास मनपा अधिकारी व पदाधिकाऱ्यांना कळावा यासाठी मनसेचे नगरसेवक सचिन भोयर सभागृहात संपूर्ण शरीर चिखलाने माखून घेत निषेध करीत निवेदन घेऊन सभागृहात दाखल झाले.
नगरपालिका काळात करोडो रुपये खर्च करून केलेल्या मलनिस्सारण योजनेची तोडफोड अमृत कंत्राटदाराने केली आहे. याची दुरुस्ती अमृत कंत्राटदाराकडून करून घ्यावी. बऱ्याच ठिकाणी पाइपलाइन हायड्रोलिक प्रेशर मशीनने जोडली गेलेली नाही. कोणतेही सुरक्षेचे मापदंड वापरले नाहीत. खोदकाम करताना नगरसेवकांना माहिती दिली जात नाही, पाइपलाइन टाकल्यानंतर सिमेंट काँक्रीट रोड सिमेंटीकरण करावे आदी मागण्यांना घेऊन नगरसेवक भोयर यांनी अभिनव आंदोलन केले.
यावेळी मनवासे जिल्हाध्यक्ष भारत गुप्ता, शहराध्यक्ष मंदीप रोडे, जनहित जिल्हाध्यक्ष राजू बघेले, महिला शहराध्यक्षा प्रतिमा ठाकूर, मनवीसे शहराध्यक्ष नितीन पेंदाम, शहर उपाध्यक्ष महेश वासलवार, मनवीसे शहर उपाध्यक्ष नितेश जुमडे, अक्षय चौधरी, वाहतूक सेनेचे बळी शेळके, आसलाम शेख, जाफर बेघ, नितीन भोयर, संजय फर्डे, रामडेवार आदी महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.